पुणे : पोषक हवामानामुळे राज्यात दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आज (१३) कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, राजस्थान मधील कमी दाब क्षेत्रापासून गुजरात, शाजापूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली
राजस्थान आणि गुजरात परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, त्याचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतर होणार आहे. ही प्रणाली राज्यात पाऊस वाढण्यास पोषक ठरणार आहे.

राज्यात १३ सप्टेंबर रोजी जिल्हानिहाय हवामान इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १३) कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे.

तर मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्हे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात विजा, गडगडाटासह पावसाचा “येलो अलर्ट” हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) :
कोकण :
पालघर : मोखेडा ४५, तलासरी ४४, वाडा ४१,
रायगड : कर्जत ८०, खालापूर ६५, माथेरान १३६, पनवेल ६४, पेण ५८, पोलादपूर ५७.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग ६०, कणकवली ३९, सावंतवाडी ४६.
ठाणे : आंबरनाथ ४९, कल्याण ४२, शहापूर ७४, ठाणे ४३, उल्हासनगर ५०.

मध्य महाराष्ट्र :
जळगाव : बोधवड ४१.
कोल्हापूर : गगणबावडा ५९.
नाशिक : हर्सूल ४६, इगतपुरी ९८, नाशिक ३८, ओझरखेडा ४०, पेठ ६५, त्र्यंबकेश्वर ५४.
पुणे : लोणावळा कृषी ८८.
सातारा : महाबळेश्वर १०९.

विदर्भ :
गडचिरोली : धानोरा ४९.
गोंदिया : आमगाव ४४, देवरी ४७, गोंदिया ७६, गोरेगाव ६७, सालकेसा ६३.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *