कोकण, पूर्व विदर्भात जोर, उर्वरीत महाराष्ट्रात कमजोर

पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे मात्र यंदाच्या हंगामात पावसाची ओढ असलेल्या भागात झालेला पाऊस सुखावणारा ठरला. राज्यात सध्या हलक्या सरी पडत असून, १० ते १६ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरीत राज्यात बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाच्या दडीमुळे अत्यंत कमी पाऊस झाल्याने मॉन्सूनच्या उर्वरीत हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, आणि हवेच्या वरच्या थरात असलेली परस्पर विरोधी वाहणाऱ्या वाऱ्यांची स्थिती या प्रणाली पूरक ठरल्याने गेल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. पूर्व विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते.

२ ते ८ सप्टेंबर या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता राज्याच्या सर्वच विभागात चांगला पाऊस झाला आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. बीड जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत ३१५ टक्के अधिक पाऊस पडला. जालना जिल्ह्यात २७७ टक्के, परभणी २५५ टक्के, उस्मानाबाद २१५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१७ टक्के अधिक तर रत्नागिरी जिल्ह्यात २१६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात १९६ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे उणे ४४ टक्के पावसाची नोंद झाली. तर गडचिरोली जिल्ह्यात उणे ९ टक्के, भंडारा १० टक्के अधिक आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात उणे ६ टक्के आणि सातारा जिल्ह्यात १ टक्के अधिक पावसाची नोंद होत पावसाने सरासरी गाठली असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (१० ते १६ सप्टेंबर) राज्यातील कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाडा, पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तर दुसऱ्या आठवड्यात (१७ ते २३ सप्टेंबर) संपुर्ण कोकण, घाटमाथा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही भागात चांगल्या पावसाचे अंदाज असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्राचा बहुतींशी भाग आणि मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात ढगाळ हवामान, पावसाच्या सर्वदूर हजेरीने तापमानात चढ-उतार, तसेच उकाडा वाढल्याचे दिसून आले. पुढील आठवड्यामध्ये राज्यात कमाल तापमान २६ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २४ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यातही कमाल तापमानाचा पारा २६ ते ३२ अंश, तर किमान तापमान २० ते २४ अंशादरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: