राज्यात जुलै अखेरपर्यंत २४ टक्के अधिक पावसाची नोंद

अमोल कुटे

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) जुलैअखेरपर्यंत राज्यात ६६९.९ मिलीमीटर (२४ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय. महिन्याच्या सुरूवातीला पडलेला खंड, कोकण, घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला विक्रमी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, दरडी कोसळून झालेली जिवित व वित्त हानी हे जुलै महिन्यातील पावसाचे वैशिष्ट्ये ठरले. धुळे, नंदूरबारसह उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची दडी कायम असल्याचे चित्र ही पहायला मिळाले.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती न होणे, मॉन्सूनचे प्रवाहांचा वेग मंदावणे, अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा न होणे या कारणांमुळे २० जून नंतर राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. पावसाची दडी १० जुलैपर्यंत कायम होती. कोकणात मात्र पावसाची रिपरीप सुरूच होती. १० जुलैनंतर पावसाला पोषक हवामान होऊन, राज्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली. दरम्यान १३ जुलै रोजी मॉन्सूनने संपुर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जुलै अखेरपर्यंत पडलेला पाऊस (सौजन्य : vagaries.in)

कोकणासह, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातल्याने “आभाळ फाटलं” असेच काहीसे चित्र पहायला मिळाले. २२ जुलै रोजी कोल्हापूरमध्ये तुळशी धरण क्षेत्रात ८९५ मिलीमीटर, दूधगंगा ४८०, राधानगरी ५६७ मिलीमीटर, साताऱ्यातील कोयना धरण क्षेत्रात ६१० मिलीमीटर, नवजा येथे ७४६, महाबळेश्वर येथे ५९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, सांगलीतील वारणावती येथे ५७४ मिलीमीटर आणि पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी परिसरात ५१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

घाटमाथ्यावरील या पावसाने रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नद्यांना यंदाही पूर आल्याने नागरिकांना बेघर व्हावे लागले. पूरामुळे शेतजमीन व भात पिकांचे अतोनात नुकसान झाले. कोल्हापूर, सातारा, रायगड जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे ५० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.

कोकण विभागात सर्वाधिक, विदर्भात सर्वांत कमी पाऊस

३१ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर विदर्भात सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली. जुलै अखेरपर्यंत राज्यात सरासरी ५३८.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ६६९.९ मिलीमीटर (२४ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. विभागनिहाय पावसाचा विचार करता कोकणात २४०२.७ मिलिमीटर (३७  टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात ५००.४ मिलिमीटर (२६ टक्के अधिक), मराठवाड्यात ४२३.७ मिलिमीटर (३४ टक्के अधिक), तर विदर्भात ४९७.३  मिलिमीटर (४ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे.

धुळे, नंदूरबारमध्ये पावसाची ओढ कायम

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता, मध्य महाराष्ट्रातील धुळे (उणे ४३) व नंदूरबार (उणे २३) जिल्ह्यात पावसाची ओढ कायम असल्याने सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. जळगाव, बुलडाणा, अमरावती, अकोला, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने कशीबशी सरासरी गाठली. तर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक, सातारा जिल्ह्यात ७० टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

देशात ९९ टक्के पाऊस

यंदाच्या मॉन्सून हंगामात जुलै अखेरपर्यंत देशात ४४९.० मिलीमीटर पावसाची (९९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जुलै अखेरपर्यंत देशात सरासरी ४५२.२  मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ईशान्य भारतातील, सर्वच राज्यासह, लडाख, गुजरात, केरळमध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मणिपूर राज्यात सर्वात कमी अवघा ३८ टक्के (उणे ६२ टक्के) पाऊस पडला आहे. तर तेलंगणात सर्वाधिक सरासरीच्या तुलनेत ५५ टक्के अधिक, हरियाणात ५१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडूत सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरीत देशात सरासरी इतका पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *