पुणे : राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानसह कोरडे हवामान होत आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची विश्रांती कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर पासून पूर्व आसामपर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य राजस्थान आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे.

सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान नसल्याने बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता. २४) कोकणात काही ठिकाणी उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :
कोकण :
सिंधुदुर्ग : मुलदे (कृषी) २५, वैभववाडी ३१.
मध्य महाराष्ट्र :
नंदूरबार : अक्कलकुवा ३१.
मराठवाडा :
औरंगाबाद : सिल्लोड २४.
बीड : आष्टी ३४, परळी वैजनाथ ३०.
जालना : भोकरदन ४७, जाफराबाद ३६.
परभणी : पालम ३०.