पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानसह कोरडे हवामान होत आहे. काही भागात ऊन सावल्यांच्या खेळात अधुन-मधून श्रावण सरींनी हजेरी लावली आहे. पुढील चार-पाच दिवस मुख्यतः कोरड्या हवामानासह तुरळक ठिकाणी श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर पासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य राजस्थान आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. हरियाणापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे.

रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता. २३) कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :
कोकण :
पालघर २००, डहाणू ५०, तलासरी, वैभववाडी प्रत्येकी ४०, अंबरनाथ, भिवंडी, जव्हार, कल्याण, मोखेडा, उल्हासनगर, वसई प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र :
कोपरगाव ओझरखेडा प्रत्येकी ४०, गगणबावडा, हर्सूल, इगतपुरी प्रत्येकी ३०, अक्कलकुवा, चोपडा, महाबळेश्वर, मोहोळ, निफाड, पेठ, शहादा, सोलापूर प्रत्येकी २०.
मराठवाडा :
रेणापूर १५०, मुखेड, शिरूर अनंतपाळ प्रत्येकी ६०, नायगाव खैरगाव, उमरगा प्रत्येकी ५०, औसा, लोहारा प्रत्येकी ४०, चाकूर, जळकोट, कळंब, मानवत, निलंगा, तुळजापूर प्रत्येकी ३०.
विदर्भ :
कोर्पणा, उमरखेड, झारी झामणी प्रत्यकी २०.