पुणे : राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. उद्यापासून (ता. २२) पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ईशान्य राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशात एक, मराठवाड्यात एक, तसेच पश्चिम बंगाल आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत एक अशा तीन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून, तो बिकानेर पासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे

राजस्थानजवळील चक्राकार वाऱ्यांपासून तमिळवाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) तयार झाला आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा असून, मराठवाड्यातील चक्राकार वाऱ्यांपासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत आणखी एका ट्रफची निर्मिती झाली आहे.

राज्यात २२ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

शनिवारी (ता. २१) पावसाने उघडीप दिल्याचे पहावयास मिळाले. अधून-मधून पावसाच्या सरी येत होत्या. उद्यापासून (ता. २२) राज्यातील पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :

कोकण :
उल्हासनगर ११०, मंडणगड ८०, अंबरनाथ, बेलापूर, डहाणू प्रत्येकी ७०, हर्णे, कल्याण, माथेरान, म्हसळा, कुलाबा, ठाणे प्रत्येकी ६०, भिवंडी, दापोली, कर्जत प्रत्येकी ५०, मालवण, पालघर, पेण, पोलादपूर, श्रीवर्धन प्रत्येकी ४०.

मध्य महाराष्ट्र :
महाबळेश्वर ५०, देवळा, गगणबावडा, गिरणा धरण, लोणावळा प्रत्येकी ४०, राहाता, सुरगाणा प्रत्येकी ३०.

मराठवाडा :
जालना ४०, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, लोहारा, उमरगा प्रत्येकी २०.

विदर्भ :
अकोट, मलकापूर, नांदूरा, तेल्हारा प्रत्येकी ५०, धारणी ४०, अकोला, जळगाव जामोद, खामगाव, मातोळा, संग्रामपूर, शेगाव प्रत्येकी ३०.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *