महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची राज्य सरकारकडून स्थापना

पुणे : सेंद्रिय उत्पादनांना असणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे अधिकचे पाहता शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती करण्याचा कल वाढला आहे. मात्र सेंद्रिय उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रमाणिकरणाची आवश्यकता असते. यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सेंद्रीय उत्पादन प्रमाणिकरण करून मिळणार आहे.

सद्यस्थितीत राज्यामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरणाचे काम खाजगी प्रमाणिकरण संस्थामार्फत करण्यात येत आहे. सदरची बाब शेतकऱ्यांसाठी खर्चिक असल्याने महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेच्या स्थापनेमुळे माफक दरामध्ये सेंद्रिय कृषी उत्पादनाचे प्रमाणिकरण होणार असल्यामुळे शासनाच्या “विकेल ते पिकेल” या धोरणानुसार सेंद्रिय मालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे.

महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेचे मुख्यालय हे अकोला येथे स्थापन करण्यात येणार असून क्षेत्रीय कार्यालये कृषी विभागाच्या ८ उपविभागात स्थापन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेस आवश्यक एकूण १५ अधिकारी व कर्मचारी पदे ही महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या मंजूर मनुष्यबळातून वर्ग करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

‘मोर्फा’च्या पाठपुराव्यास यश
सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, मार्केटिंग संदर्भात व शेतकऱ्यांना येत असलेल्या इतर अडचणी संदर्भात ठोस निर्णय होऊन त्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी महा ऑरगॅनिक ॲन्ड रेस्यूडयू फ्री फार्मस असोसिएशन (मोर्फा) च्या वतीने गेली तीन वर्षापासून प्रयत्न सुरू होते. या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाकडून महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती ‘मोर्फा’च्या वतीने देण्यात आली.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून ४ मार्च २०२१ रोजी मुंबई मध्ये कृषी, पणन, सहकार व अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री व साचिव यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत सेंद्रिय प्रमाणीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची संस्था असावी अशी प्रमुख मागणी मोर्फाच्या वतीने करण्यात आली होती. या बैठकीत प्रशासनाकडून सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यात येतील,असे आश्वासन देण्यात आले होते. मोर्फाचे अध्यक्ष कृषीभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे व उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

राज्य सरकारने सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील सेंद्रिय शेतीमाल उत्पादनाचे मार्केटिंग करण्यास सुलभ होणार आहे. त्यामुळे राज्यात सेंद्रिय शेतीला निश्चितपणे चांगली गती मिळेल” मोर्फाचे व्यवस्थापकीय संचालक मा.युगेंद्रदादा पवार यांचे नेतृत्वाखाली मोर्फा ची यशस्वी घोडदौड चालु आहे. मोर्फाचे पहिले खूप मोठे यश आहे.

– प्रल्हाद वरे, सचिव, मोर्फा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: