विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या (ता.२९) विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग काहीसा उत्तरेकडे सरकला असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीवर आहे. उत्तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश परिसरावर आहे. दोन दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार कडे सरकत आहे. अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून, बिहार, मध्य प्रदेशसह उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

राज्यात २९ जुलै रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

उद्या (ता.२९) कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.  

राज्यात २९ जुलै रोजी जिल्हानिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर ओसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्राचा पूर्वभाग, मराठवाडा, विदर्भात हलका पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी ऊन सावल्यांच्या  खेळात अधूनमधून हलक्या सरी अनुभवायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे.

बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोकणातील पालघर,  रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये

कोकण :
पालघर : जव्हार ५४, मोखेडा ४८.
रायगड : माथेरान ५४, सुधागडपाली ४५.
रत्नागिरी : संगमेश्वर ४७.

मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : गगणबावडा ३५, पन्हाळा ३६, राधानगरी ३९, शाहूवाडी ३५.
नाशिक : पेठ ३५, त्र्यंबकेश्वर ४६.
पुणे : लोणावळा कृषी ४१, वेल्हे ४०.
सातारा : महाबळेश्वर ८१.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: