अमोल कुटे

पुणे : मोठ्या खंडानंतर राज्याच्या विविध भागात मॉन्सून सक्रीय होऊ लागला आहे. कोकण आणि विदर्भासह बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील दोन आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर चांगलाच वाढण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.  
 
जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. आता राज्यात पावसाला सुरूवात झाली असून, पावसाने कमी-अधिक प्रमाणात लावलेल्या हजेरीने पाण्याअभावी करपून चाललेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.  

१ ते ७ जुलै कालावधीत राज्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण दर्शविणारा नकाशा (सौजन्य : हवामान विभाग)

गेल्या आठवड्यात (१ ते ७ जुलै) कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने ओढ दिली. तर गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता उर्वरीत विदर्भातही पाऊस पडला नाही. परिणामी राज्याच्या कमाल आणि किमान तापमात मोठी वाढ झाल्याने भर पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभवायला मिळाला. जळगावामध्ये तर कमाल तापमानाचा पारा चाळीशी वर पोचला.

९ ते १५ जुलै कालावधीत राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

पुढील दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात पहिल्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) राज्यात सर्वदूर पावसाला सुरूवात होणार आहे. पूर्व मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

१६ ते २२ जुलै कालावधीत राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

दुसऱ्या आठवड्यातही (१६ ते २२ जुलै) राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुढील दोन आठवड्यातील कमाल तापमानाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

पुढील दोन्ही आठवड्यातील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केलाय. यात पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या हजेरीनंतर कमाल तापमानात घट होणार आहे. अनेक भागात किमान तापमान सरासरी इतके राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *