महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पथदर्शी प्रकल्प

अनिल देशपांडे

राहुरी : खरीपात सोयाबीनचे पीक काढणीच्या वेळी पावसात सापडते. त्याचा बियाण्याच्या ऊगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. या दोन्ही प्रश्नांना समर्थ पर्याय म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे या वर्षी प्रथमच उन्हाळी सोयाबीन मुलभूत बीजोत्पादनाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. सोयबीन उत्पादनासाठी हा पर्याय क्रांतिकारी प्रयोग ठरु शकतो, असे मत प्रमुख बियाणे शास्त्रज्ञ डॉ. आनंद सांळुके यांनी व्यक्त केले.

खरीप हंगामात पावसामध्ये बियाणे, सोयाबीन पीक सापडल्याने बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. उत्पादनात घट येते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी उन्हाळी हंगामात खरिपाचे बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेण्याची सूचना केली. कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सांळुके, बीजोत्पादन अधिकारी डॉ. चंद्रभान साळुंखे, प्रा.बाळासाहेब शेटे व सहाय्यक बीजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास गागरे यांनी कार्यक्रमाची प्रक्षेत्रावर यशस्वी पणे अंमलबजावणी केली.

विद्यापीठ प्रक्षेत्रावर घेतलेल्या उन्हाळी बिजोत्पादन कार्यक्रमात खरीपापेक्षाही सोयाबीन बियाणे उत्पादनात वाढ झाली आहे. हेक्‍टरी २२ क्विंटल सोयाबीन तर प्रक्रियायुक्त बियाणे १८ क्विंटल मिळाले. खरीप हंगामात हेच प्रमाण अनुक्रमे १२ ते १५ क्विंटल असते. उन्हाळी हंगामात उत्पादित बियाण्याची उगवण क्षमता ही खरिपापेक्षा अधिक आहे. मानांकन चाचण्यांमध्ये उगवण क्षमता ८० ते ९० टक्के आढळली आहे. ते सरासरी राष्ट्रीय मानांकनापेक्षा (७०% ) जास्त आहे. गतवर्षी विद्यापीठात सरासरीपेक्षा अडीचपट पाऊस जास्त झाला. त्यामुळे सोयाबीनचे विद्यापीठाचे १३५० क्विंटल बियाणे खराब झाले. उगवण क्षमतेत ते नापास ठरले.

निवडलेला वाण – जे. एस.९३०५
पेरणीचा कालावधी – २० ते ३१ जानेवारी
खतांची मात्रा – १०:२६:२६, २० :२०, १९ :१९ :१९ प्रति एकरी एक बॅग.
बियाणे – प्रति एकरी ३० किलो
दोन ओळीतील अंतर – ३० सेंटिमीटर
दोन रोपातील अंतर – दहा सेंटिमीटर
अंतर मशागत – विसाव्या दिवशी सायकल कोळपेने कोळपणी

पाणी, कीड, अन्नद्रव्य व्यवस्थापन
सोयाबीन हे पीक उष्णता, प्रकाश यांना अत्यंत संवेदनशील आहे अधिक तापमानाचा फुले गळतीवर व उत्पादनावर परिणाम होऊ नये, म्हणून कमी दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या प्रवाही पद्धतीने देण्यात आल्या. यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने एकूण आठ पाळ्या दिल्या. त्यामुळे पावसाळ्यातील खरीप हंगामातील आर्द्रतापूर्ण वातावरणाची निर्मिती झाली. काढणी आधी पंधरा दिवस पाणी बंद केले. पीकसंरक्षणासाठी खोडमाशी व पाने खाणारे मावा तुडतुडे प्रतिबंधक अशा दोन फवारण्या केल्या. पीक फुलोरा अवस्थेत असताना १९: १९ :१९ हे द्रवरूप खत दिले.

सोयाबीन काढणी व मळणी
एप्रिल अखेरीस पीक तयार झाले. खरीपात पीक परिपक्व होण्यास ९० ते ९५ दिवस लागतात. उन्हाळी हंगामात ते ७५ ते ८५ दिवसातच पक्क झाले. सोयाबीनच्या बियाण्याचे आवरण ,कवच अत्यंत नाजूक व संवेदनशील आहे आणि कवचावरच अंकुर, भ्रुण असतो .त्यामुळे त्याच्या हाताळण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अन्यथा बियाण्याची उगवणक्षमता कमी होते. एका मिनिटाला साडेचारशे ते पाचशे इतक्या कमी गतीने आरे फिरतील या पद्धतीने मळणी केली गेली .त्यामुळे कमीत कमी हानी झाली व बियाणाची गुणवत्ता टिकून राहिली. २४ एप्रिलला पिकाची काढणी केली दोन मेपर्यंत मळणी पूर्ण झाली पुढील आठ ते दहा दिवसात उगवण क्षमतेच्या चाचण्या घेण्यात आल्या.

सोयाबीन हे राज्यातील मुख्य कडधान्य व तेलबिया पीक आहे .४२ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन घेतले जाते. दर वर्षी किमान दहा लाख क्विंटल बियाण्याची सोयाबीन ची कमतरता जाणवते. उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर राबवला पाहिजे. तरच बियाणांची उगवण क्षमता व टंचाई प्रश्न सुटण्यास मदत होईल.

– डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.

सोयाबीन हे पीक सूर्य प्रकाशाला अत्यंत संवेदनशील आहे. उन्हाळी हंगामात ३५ अंश सेल्सिअस पेक्षा तापमान वाढल्यास फुल गळ होऊन उत्पादनात घट होते. परागीभवन होत नाही. सोयाबीन दाणा बारीक राहतो. तरीही बियाणांचा तुटवडा, पावसाळ्यात सोयाबीनच्या बियाणांचे होणारे नुकसान आणि बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर होणारा विपरीत परिणाम या समस्यांवर उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन हा समर्थ पर्याय आहे. उन्हाळी हंगामात पावसाळ्याप्रमाणे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी जाणवला.

– डॉ. मिलींद देशमुख, कसबे डिग्रस, सांगली.

शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे स्वतः तयार केले पाहिजे. खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादनातील समस्येवर उन्हाळी हंगामातील बीजोत्पादनाचा पर्याय हा अत्यंत चांगला पर्याय आहे. या नव्या बदलाचा शेतकऱ्यांनी स्वीकार केला पाहिजे.

– डॉ. दत्तात्रय वने, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी, मानोरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *