पुणे : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिल्पकार विनोद येलापूरकर यांचा गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथे नव्याने उभारलेला स्टुडिओ अचानक लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडला. या आगीत २० वर्षापासून तयार केलेल्या कलाकृती व साहित्य जळून खाक झाल्या. या राखेतून पुन्हा भरारी घेण्यासाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांनी केले आहे.
मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनोद येलारपूरकर गेली वीस वर्षे पुण्यामध्ये शिल्पकार म्हणून कार्यरत आहे. शहरामध्ये सारसबाग चौक, खंडोबा मंदिर, संत कबीर चौक, पासोड्या विठोबा चौक, ओंकारेश्वर चौक आदी ठिकाणी त्यांच्या कलाकृती पहावयास मिळतात.
१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी अकराच्या सुमारास गोऱ्हे बु. येथील नव्याने उभारलेल्या स्टुडीओला भीषण आग लागली. त्यामध्ये संपूर्ण सुडीओसह, सुमारे १०० मुर्त्या, ३५ ते ४० साचे, खांब, कमानी, लाकडी फळ्या, कापड असे भरपूर सजावटीचे साहित्य, कच्चा माल आगीमध्ये जळून गेले. वीस वर्षे परिश्रम करून साकारलेल्या कलाकृतीही आता शिल्लक राहिल्या नाही.

या हरहुन्नरी कलाकाराला पुन्हा भरारी घेण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. राज्यातील कलाप्रेमींनी त्यांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत करावी, असे आवाहन पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जाधव, रविंद्र पठारे यांनी केले आहे.
स्टुडिओला लागलेल्या आगीत वीस वर्षाच्या कष्टांचे आणि लाखों रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. कला रसिकांनी रोख आणि वस्तू स्वरुपात केलेल्या मदतीचा मी योग्य प्रकारे विनियोग करीन.
– विनोद श्रीराम येलापूरकर, संपर्क – ९८२२९२४४२२/९८२२४८८७९६