पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या “ताऊते” चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता वाढत आहे. रविवारी रात्री हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील समुद्रात दाखल झाले. ताशी १५५ ते १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहणाऱ्या या वादळामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत आजचा (ता. १७) दिवस अधिक सतर्कतेचा आहे.

लक्षद्वीप बेटांजवळ शुक्रवारी (ता. १४) तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून “ताऊते” चक्रीवादळाची निर्मिती झाली. पश्चिम किनारपट्टीलगतच्या समुद्रातून या प्रणालीचे केंद्र ताशी १८ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. सोमवारी (ता. १७) सकाळी या वादळाचे केंद्र मुंबईपासून नैऋत्येकडे १७० किलोमीटर, तर गुजरातच्या वेरावळपासून ३५० किलोमीटर अंतरावर होते. अतितीव्र चक्रीवादळ मंगळवारी (ता. १८) पहाटेपर्यंत पोरबंदर आणि महुवा (जि. भावनगर) दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नकाशा : वादळाची संभाव्य दिशा (सौजन्य – हवामान विभाग)

‘ताऊते’ वादळाच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर सतर्कतेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. आज कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज असून, गुजरातमध्ये काही ठिकाणी २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे वादळ राजस्थानकडे सरकण्याचे संकेत आहेत.

गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मानगाव, पनवेल, ठाण्यातील वाडा, पालघरमधील वसई आणि पालघर तालुक्यांमध्ये समुद्रालगतच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

नकाशा : वादळामुळे प्राभावित होणारा भाग व वाऱ्याचा वेग
करडा रंग – ताशी ५२ ते ६१ किलोमीटर
निळा रंग – ताशी ६२ ते ९१ किलोमीटर
हिरवा रंग – ताशी ९२ ते ११७ किलोमीटर
पोपटी रंग – ताशी ११८ किलोमीटरपेक्षा अधिक

वादळ आणि पावसामुळे घरांचे नुकसान होणार असून, पीके आणि फळझाडांनाही फटका बसणार आहे. पुणे, नगर, नाशिक, नंदूरबार जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये वादळाचा प्रभाव जाणवणार असून, जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. वादळ प्रभावित भागात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *