मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय होण्यास ठरणार लाभदायक

पुणे : नेर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच, अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहेत. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय होण्यास मदत होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीला धोका नाही.

यंदा मॉन्सून नियमित वेळेवर म्हणजेच १ जून रोजी केरळात दाखल होणार असल्याचे जाहीर करतानाच, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीच्या वर पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पुर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आले आहे.

विषुववृत्तीय हिंद महासागरामध्ये आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्रामध्ये समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १४) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत जाताना आणखी तीव्र होईल. या वादळामुळे महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीला फारसा फटका बसणार नसला तरी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सौजन्य : हवामान विभाग

दरम्यान, सध्या मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. विषूववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरवात झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे. अंदमान निकोबार बेटांवरही मॉन्सून दाखल झाल्याची वर्दी लवकरच मिळणार आहे. या भागात साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *