महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

पुणे : कृषीपंप वीज जोडणी धोरण- २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांची सुधारीत थकबाकी रक्कम ही सप्टेंबर २०२० च्या वीज बिलानुसार गोठविण्यात आली आहे. ज्या कृषी ग्राहकांने चालु वीज बिलाचा भरणा केला आहे. त्यांचा वीज पुरवठा गोठविलेल्या थकबाकीसाठी खंडीत करण्यात येऊ नये, असे आदेश महावितरणकडून देण्यात आले आहेत.

देयक व महसूल विभागाचे मुख्य अभियंता यांनी १५ फेब्रुवारी रोजी कृषी वीजपुरवठा खंडित करण्याविषयी परिपत्रक काढले आहे. त्यात सप्टेंबर २०२० च्या वीज बिलानुसार गोठविण्यात आलेल्या रक्कमेवर कुठलेही व्याज किंवा विलंब आकार लागणार नाही. सदर रक्कम ग्राहकास सवलतीच्या काळात म्हणजेच पुढील ३ वर्षे (३१ मार्च २०२४) भरण्याची सुविधा ग्राहकास देण्यात आलेली आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२० च्या बिलातील गोठविण्यात आलेल्या थकबाकी करीता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

कृषी धोरणाअंतर्गत कृषी ग्राहकांच्या विजबिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास सदर तक्रारीचे निवारण करून थकबाकी रक्कम पूर्णगणित करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही या परीपत्रकात देण्यात आलेल्या आहेत. चालु वीज बिल भरणा न करणाऱ्या वीज ग्राहकांना कलम ५६ नुसार वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत नोटीस बजावणे आवश्यक आहे व त्यानंतरच संबधीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात यावा. परंतु या बाबत क्षेत्रिय कार्यालयांकडुन आदेशांचे पालन केले जात नाही, असे निदर्शनास आलेले आहे. सदर बाब गंभीर असुन कृषी धोरणाच्या अंतर्गत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणारी आहे.

ग्राहकाची वीज बिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्या तक्रारीचे प्राधान्याने निवारण करून सदर कृषी ग्राहकाची थकबाकी पुन:निर्धारीत करावी. सुधारीत थकबाकी भरण्याकरीता कृषी ग्राहकांना देण्यात आलेल्या सवलतीनुसार प्रत्येक ग्राहकाला कृषी धोरणाचा जास्तीत जास्त लाभ कशाप्रकारे घेता येईल, याबाबत सविस्तर माहिती द्यावी, सर्व क्षेत्रिय कार्यालयांनी वरील आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

तीन लाख शेतकऱ्यांनी भरले ३१२ कोटी

नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्या. त्यानंतर राज्यात ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३१२ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

काय आहे थकबाकी सवलत योजना

थकबाकी सवलत योजना तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. म्हणजेच पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत मिळणार आहे.

महावितरणची प्रादेशिक विभागनिहाय वसुली

  • पुणे : १३८ कोटी ९१लाख रुपये
  • कोकण : ९५ कोटी ७३ लाख रुपये
  • औरंगाबाद : ५९ कोटी ३७ लाख रुपये
  • नागपूर : १८ कोटी ३९ लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: