साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा

पुणे : साखर कारखान्याने स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री होणार नाही. ठरवून दिलेल्या कोटयापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अन्यथा सबंधित कारखान्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

देशांतर्गत अतिरीक्त झालेल्या साखरेच्या उत्पादनाचे व्यवस्थापन व्हावे, साखरेची किंमत देशांतर्गत बाजारपेठेत स्थिर व्हावी तसेच ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे कारखान्यांकडून दर मिळावा या करीता केंद्र शासनाने शुगर केन (कंट्रोल) ऑर्डरनुसार साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ३ हजार १०० रुपये निश्चित केलेली आहे.

बाजारातील साखरेचा मागणी पुरपवठयातील समतोल साधण्याकरीता खुल्या बाजारात प्रत्येक कारखान्याने किती साखर विक्री करावी. यासाठीचा साखर विक्रीचा दरमहा कोटा ठरवून दिलेला आहे.. देशांतर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखरविक्री करु नये. कारखान्याच्या दरमहा साखर विक्री कोटा आणि साखर साठा या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन करणेत येऊ नये, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

वरील बाबींची अंमलबजावणी न करणे म्हणजे शासनाच्या साखरेचे दर स्थिर ठेवण्याच्या धोरणाचे उल्लंघन आहे. शुगर केन (कंट्रोल) ऑर्डर 1966 मधील तरतूदींचे पालन न केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशा सुचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d