किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

पुणे : तापमानाचा पारा घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात हुडहुडी वाढली होती. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारताताच्या किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड व कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला होता. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पहाटे गुलाबी थंडीसह, धुक्याची चादर पसरल्याचे मोहक चित्र पहायला मिळाले. मात्र पुढील चार ते पाच दिवसात पुर्व, मध्य भारतासह महाराष्ट्राच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता असल्याने, गारठाही हळूहळू कमी होणार आहे.

उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका कमी होत आहे. बुधवारी (ता. १०)निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.२ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, जळगाव, नाशिक येथे तापमान १० अंशांच्या खाली होते.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी (ता. १०) नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.२, जळगाव ९.०, कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १४.९, मालेगाव १२.६, नाशिक ९.७, सांगली १४.३, सातारा ११.७, सोलापूर १४.९, मुंबई (कुलाबा) १९.५, सांताक्रूझ १६.६, रत्नागिरी १८.१, डहाणू १७.१, औरंगाबाद ११.६, परभणी १२.१, नांदेड ११.५, उस्मानाबाद १३.८, अकोला १२.२, अमरावती १२.५, बुलढाणा ११.५, ब्रम्हपुरी ११.८, चंद्रपूर ११.८, गोंदिया १०.२, नागपूर ११.७, वाशीम १३.२, वर्धा १२.०, यवतमाळ १३.०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *