फिरत्या पशुचिकित्सा वाहनांचे लोकार्पण

पुणे : दुर्गम भागात पशुपालकांना वेळेवर दर्जेदार पशु आरोग्य सेवा देता यावी, यासाठी फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा पथकांसाठी वाहने उपलब्ध झाली असून, त्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. ही पशुचिकित्सक वाहने १० तालुक्यातील दुर्गम भागात काम करतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांनी दिली.

फिरत्या पशुचिकित्सक वाहनांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. फिरते पशुचिकित्सक वाहन संबंधित तालुक्यांमध्ये रवाना करण्यात आले. सदर फिरते पशुचिकित्सक पथकाची संकल्पना २०१७-१८ मध्ये खासदार सुप्रिया सुळे व रणजीत शिवतरे यांनी शासनाकडे केली होती.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत राज्यातील ३४९ ग्रामीण तालुक्यांमध्ये फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात ८० तालुक्यांमध्ये पथके स्थापन करण्यास गतवर्षी मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, जुन्नर, मावळ, भोर व बारामती सहा तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथके स्थापन करण्यात आली आहेत.

फिरत्या पशुचिकित्सक वाहनांमध्ये रोगनिदान करिता प्रयोगशाळा साहित्य लहान मोठ्या शस्त्रक्रिया करीत आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रथमोपचार करिता आवश्यक औषध साठा, वंध्यत्व निवारण तसेच प्रजनन विषयक आजारा संबंधित उपचाराकरिता आधुनिक उपकरणे आहेत. या वाहनांमध्ये पशुसंवर्धन विभागातील विविध योजना कुकुट पालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी प्रचार प्रसिद्धी करिता दृकश्राव्य माध्यम आहे. वाहनांकरिता तज्ञ पशुवैद्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे.

तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक

फिरत्या पशु चिकित्सक पथकाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता व पशुपालकांच्या तक्रार निवारण करिता पुण्यातील आयुक्त कार्यालयात कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. १९६२ यी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास पालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: