‘ग्लोबल कोकण’ अभियानाची ‘अपेडा’कडे मागणी

पुणे : हापूस सारखा हुबेहुब दिसणारा पण हापूसची चव नसलेला, कर्नाटकमधील आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून देशात आणि विदेशात विकला जातो. त्यामुळे हापूस आंब्याचा दर्जा बिघडतो, किमती कमी होतात, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा पुरेसा मोबदला मिळत नाही. जगप्रसिद्ध कोकण हापूसमध्ये कर्नाटकमधील आंब्याची भेसळ बंद करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘ग्लोबल कोकण’ अभियानाचे प्रमुख संजय यादवराव यांनी ॲग्रीकल्चरल ॲण्ड प्रोसेस्ड् फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटीचे (अपेडा) चेअरमन एम. अंगामुथु यांना भेटून ही मागणी केली आहे.

गेली दहा-बारा वर्ष अशा स्वरूपाची भेसळ राजरोस प्रमाणे चालू आहे. निकृष्ट दर्जाच्या आंब्यावर देवगड आणि रत्नागिरी हापूस म्हणून लेबल लावून हे आंबे सर्वसामान्य ग्राहकांना आणि परदेशात सुद्धा पाठवले जातात. यामुळे हापुस आंब्याविषयी गैरसमज निर्माण होतात. हापूससारखा दिसणारा चव नसलेला जाड सालीचा आंबा कोकणातील हापूस म्हणून ग्राहकांना खावा लागतो आणि ग्राहकांची फसवणूक होते.

हा गैरप्रकार पूर्णतः बंद व्हावा. कोकणातल्या हापूसला यापुढील काळात हापुस म्हणता येईल, अशी तरतूद जिओग्रफिक इंडिकेशन (जीआय) अंतर्गत या अगोदरच झालेले आहे. याची कडक अंमलबजावणी व्हावी व अशा स्वरूपाचा गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू आणि अपेडाचे चेअरमन एम अंगामुथु यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली.

ग्लोबल कोकणच्या युरोप आणि अमेरिकेतील कार्यकर्त्यांच्या मदतीने यावर्षी संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत थेट कोकणातून देवगड रत्नागिरी आणि राजापूर मधून हापूस आंबे निर्यात होतील अशा स्वरूपाचे नियोजन करीत आहोत. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये निर्माण केलेला आंब्याचा एक्सपोर्ट ब्रांड जगभर पोहोचेल, असे संजय यादवराव यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *