प्रशांत राठोड, डॉ. एस. एम. भोयर, डॉ. एस. डी. जाधव

सोयाबीन या पिकाची मळणी केल्यानंतर पीकाचा अवशेष जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. जनावरांची संख्या कमी असलेल्या भागात मळणीनंतर अवशेष शेतातच जाळला जातो किंवा कंपन्यामध्ये इंधन म्हणून वापरला जातो. सोयाबीन पिकाच्या अवशेषाचा वापर आच्छादन म्हणून, सेंद्रीय पदार्थ म्हणून जमीनीतील कर्ब वाढविण्यासाठी केल्यास जमीनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल.

सोयाबीन हे खरीप हंगामातील एक महत्त्वपूर्ण तेलबिया तसेच द्वीदल पीक आहे. सोयाबीन हे बहुतांश भागात घेतले जाणारे पीक असून, देशभरात ११.३३ दश लक्ष हेक्टर, तर राज्यात ४.०४ दश लक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. सोयबीन लागवडीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे . भारतीय अर्थव्यवस्थेतही या पीकाला महत्त्वाचे स्थान आहे.

सोयाबीन पीकाच्या मुळावरील गाठींमुळे हवेमधील नत्र स्थिर करण्याची क्षमता आहे. तरी या पिकाची नत्राची मात्रा स्फुरदच्या प्रमाणात कमी आहे. या पिकाची लागवड ही जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरवातीला केली जाते. जेएस-३३५ हा सोयाबीनचा प्रचलीत वाण आहे. या पिकाचा एकूण कालावधी हा ११०-१२० दिवसाचा आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सोयाबीनची कापणी व मळणी केली जाते.

अवशेषांचा वापर कसा करावा

 • अवशेषांच्या उपलब्धतेनुसार एकरी तीन ते चार टन या प्रमाणात जमिनीमध्ये गाडून टाकावा.
 • अवशेष जमिनीमध्ये गाडण्यापुर्वी त्यावर कुजावणारी बुरशीनाशक व सोबतच घरातील उरल्येल्या रासायनिक खताचे द्रावण शिंपडून घ्यावे.
 • रब्बी पिकांच्या (जसे हरभरा, गहू ) पेरणीच्या वेळी जमिनीची मशागत करून घ्यावी. शिफारशीनुसार खतांची व पाण्याची सोय करावी .
 • पाणी व रासायनिक खत या घटकांमुळे पिकाचे अवशेष कुजण्यास गती मिळते.
 • अवशेष कुजताना निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे जमीनीतील बुरशी नष्ट करण्यास मदत होत.
 • सोयाबीन या पिकाच्या अवशेषामध्ये कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर (सी-एन रेशो) कमी असल्याने तो सहज कुजला जातो.
 • सिंचनाची सोय असल्यास खड्ड्यामध्ये सोयाबीनचे अवशेष कुजून वापरल्यास अधिक उपयुक्त ठरतो.
 • अवशेष कुजल्यानंतर त्यातून १.१४ टक्के या प्रमाणात नत्र , ०.२६ टक्के स्फुरद आणि ०.६७ टक्के या प्रमाणात पालाशची उपलब्धता होते. 

अवशेषांचे फायदे

 • अवशेषांचा आच्छादन म्हणून किवा सेंद्रिय पदार्थ वापर केल्यास जमिनीतील मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वाढ होते.
 • पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या ठिकाणी जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. 
 • जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून जीवाणूंच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते.
 • जमिनीची धूप होण्यापासून बचाव होऊन जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.
   
  लेखक : प्रशांत राठोड हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. एस. एम. भोयर, एस. डी. जाधव हे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत. मो. ९६६५०५८०१७

One thought on “सोयाबीन पिकाच्या अवशेषांचे व्यवस्थापन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *