शुभम दुरगुडे डॉ. अनिल दुरगुडे

जमीन आरोग्याच्या महत्त्वपूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मृदा संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनास समर्थन देण्यासाठी प्रत्येक वर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन (डब्ल्यूएसडी) आयोजित केला जातो. इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सेस (आययूएसएस) ने २००२ मध्ये मृदा दिन साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाची शिफारस केली होती. थायलंड देशाच्या नेतृत्वात आणि जागतिक मृदा भागीदारीच्या चौकटीत एफएओने जागतिक पातळीवर मृदा दिनाच्या औपचारिक स्थापनेस पाठिंबा दर्शविला आहे.

५ डिसेंबरची तारीख निवडली गेली कारण त्या दिवशी थायलंडचा राजा दिवंगत भूमिबोलल अद्दुल्यदेज यांचा अधिकृत वाढदिवस आहे. मृदा दिन या संकल्पनेचे ते एक प्रमुख उद्गाते होते. जागतिक मृदा दिन साजरा करण्यामागे असंख्य कारणे आहेत. मृदा आणि मृदेच्या धोक्यात आलेल्या आरोग्याची चिंता शास्त्रज्ञांना भेडसावू लागलेली आहे. गेल्या काही दशकात मृदा या संसाधनाचा अनियोजित वापर केला गेला आणि अद्याप हि चालू आहे. रासायनिक खतांचा वारेमाप वापर, चुकीच्या सिंचन पद्धती, भूसुधाराकांचा अशास्त्रीय पद्धतीने वापर इत्यादी घटक मृदेचा ऱ्हास घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात.

जमिनीचे आरोग्य म्हणजे दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असणे, की याद्वारे पर्यावरणातील हवा व पाणी यांचे संवर्धन होईल, याशिवाय अन्नधान्य सुरक्षा आणि मनुष्य प्राणीमात्रांचे आरोग्य सुधारले जाईल. जमिनीच्या आरोग्याचा अथवा जमिनीच्या सुपिकतेचा गेल्या दशकातील आलेख आपण बघितला तर तो चक्रावून टाकणारा आहे. जमिनीतील घटते सेंद्रिय कर्ब या सर्वांमध्ये आपल्याला वेळोवेळी संकेत देत आले परंतु आधुनिकतेकडे सोबतच औद्योगीकरणाकडे बेभान होऊन चाललेल्या मनुष्य प्राण्याच्या हे लक्षात आले नाही.

मृदा संवर्धन आणि त्या संदर्भात उपाययोजनांवर या जागतिक मृदा दिनानिमित्ताने विचार केला पाहिजे जमिनीवरील सुपीक थर नष्ट होण्यापासून प्रतिबंध किंवा अति प्रमाणातील क्षार व रासायनिक प्रदुषकांपासून तसेच जमिनी समस्याप्रधान बनण्यापासून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे मृदा संवर्धन

पिकांची फेरपालट व पिक अवशेषांचा वापर

एकाच जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यास जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते. फेरपालटीमुळे तणे, किडी, व रोगांचे तीव्रता कमी होते. जमिनीची धूप थांबवते. नत्राचे स्थिरीकरण होते. शेतामध्ये उरलेल्या पिकअवशेषांचा अच्छादन म्हणून कोरडवाहू पिकामध्ये वापर केल्यास ओलावा टिकवून ठेवला जातो, तसेच फळबागेत वापर केल्यास तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते व तणांचा प्रादुर्भाव होत नाही आणि विघटनानंतर सेंद्रिय कर्बात रुपांतर होऊन सूक्ष्म जीवांना खाद्य म्हणून उपयोग होतो. विविध तणे फुले येण्यापूर्वी उपटून जमिनीत मिसळल्यास सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत होते.

हिरवळीच्या खतांचा वापर

समस्या प्रधान जमिनींमध्ये दोन ते तीन वर्षातून एकदा ताग किंवा धैचा सारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत फुले लागणीवेळी गाडावीत.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन

 • जागतिक हवामान बदलाला बळी पडणारा मृदेतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेला बळकट करणारा महत्त्वाचा घटक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेणखताचा अपुरा पुरवठा आहे त्यांनी दर दोन ते तीन वर्षातून एकदा हिरवळीचे पीक (उदा. धेंचा, ताग, चवळी इ.) घेऊन जमिनीत गाडावी.
 • रासायनिक खतांबरोबर निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर करावा (५:१ प्रमाण) त्यामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होऊन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
 • शेतातील तणे फुले येण्यापूर्वी जमिनीत जागेवर टाकल्यास ते कुजाल्यानंतर मातीत सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
 • पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर केल्यास ओलावा व्यवस्थापनाबरोबर अवशेष कुजल्यानंतर कर्बात वाढ होते.

खतांचा संतुलित वापर

रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमीनीच्या आरोग्यावर दुरोगामी परिणाम होताना दिसून येत आहेत. माती परीक्षणानुसार शिफारस केलेली खतमात्रा जमिनीस व पिकास दिली गेली पाहिजे, रासायनिक खतांच्या वापरा बरोबरच जैविक खतांचा उदा. कडधान्य पिकांसाठी रायझोबियम व तृणधान्य पिकांमध्ये ॲझोटोबॅक्टर  तसेच विविध सह्जीविंचा देखील वापर बिजप्रक्रीयेद्वारे किंवा शेणखत स्लरीतून केला गेला पाहिजे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कमतरतेनुसार वापर

महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९ %) व लोह (२३ %) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. जमिनीत माती परीक्षणानुसार जस्त ०.६ पीपीएम पेक्षा कमी असल्यास तसेच लोह ४.५ पीपीएम पेक्षा कमी असल्यास कमतरता समजावी. ही कमतरता विशेषतः जास्त विम्ल प्रकारचा सामू (८.५ पेक्षा जास्त), जास्त क्षारता (०.५ डेसी सा. पेक्षा जास्त), चुनखडीयुक्त (मुक्त चुना १० % पेक्षा जास्त) व कमी सेंद्रिय कर्ब (०.४० % पेक्षा कमी) असलेल्या जमिनींमध्ये दिसून येते. यामुळे विविध पिकांवर कमतरतेची लक्षणे दिसून येतात, परिणामी उत्पन्नावर वर पिकांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात.

सूक्ष्म अन्नद्रव्ये ही पिकाला अत्यंत कमी प्रमाणात गरजेची असली तरी पिकांच्या एकूण वाढीमध्ये व उत्पन्नात त्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. ही अन्नद्रव्ये पिकांमधील अनेक मुलभूत प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात (उदा. वनस्पतीत उत्प्रेरक, संप्रेरक निर्मितीचे कार्य, हरितद्रव्य निर्मिती, फुल व फळधारणेस मदत आणि प्रथिने तयार करणे इ.) अश्या सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट व तसेच पिकास पुरवलेल्या इतर मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

समस्याप्रधान जमिनींचे व्यवस्थापन व भूसुधाराकांचा शास्त्रीय पद्धतीने वापर

 • जमीन चोपण असेल (सामू ८.५ पेक्षा जास्त, क्षारता १.५० डेसी सायमन / मीटर पेक्षा कमी आणि विनिमय सोडीअम १५ % पेक्षा जास्त) तर माती परीक्षण करून जीप्सम ची मात्र काढून शेणखतात मिसळून किंवा हिरवळीची खते गाडतेवेळी द्यावी.
 • जमीन चुनखडीयुक्त असेल (सामू ८.० पेक्षा जास्त, मुक्त चुनखडी १० % पेक्षा जास्त) तर साखरकारखाण्याची मळी कम्पोस्ट एकर १ ते २ टनापर्यंत पाच वर्षातून एक वेळा वापरावी. तसेच स्फुरद उपलब्धता वाढविण्यासाठी प्रोम (PROM) खत वापरावे यामध्ये एकूण स्फुरदाचे प्रमाण १० % असते किंवा स्टेरामिलाचा (हाडाचे खत : स्फुरद २१ %) याचाही वापर करू शकता.
 • क्षारयुक्त जमिनीमध्ये (सामू ८.५ पेक्षा कमी, क्षारता १.५० डेसी सायमन / मीटर पेक्षा जास्त आणि विनिमय सोडीअम १५ % पेक्षा कमी) अतिरिक्त पाण्याबरोबर क्षारांचा निचरा होण्यासाठी निच-याची व्यवस्था करावी आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा (शेणखत, कम्पोस्ट, गांडूळखत, प्रोम खत इ.) वापर करावा.
 • आम्ल जमिनीमध्ये (कोकणातील सामू ६.५ पेक्षा कमी, क्षारता ०.२५ डेसी सायमन / मीटर पेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण नसते) शेणखतात लाईम सामुनुसार मिसळून सुधारणा करून घ्यावी. स्फुरद उपलब्धतेसाठी रॉक फोस्फेटचाही वापर करू शकता तसेच पालाश साठी बायोचारचा वापर शेणखतात आठवडाभर मुरवून केल्यास सामू वाढविण्यास मदत होते व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. तसेच या बायोचार चा उपयोग फळझाडांसाठी केल्यास जमिनीत कर्ब, सूक्ष्मजीवांचे प्रमाणही वाढते.
 • सर्वसाधारण हलक्या जमिनीत सेंद्रिय भरखते, जोरखते, शहरी खत, गांडूळखत. या सेंद्रिय खातात झीओलाईट सारखे खनिज वापरले तर सिलिकॉन व पालाश सारखे अन्नद्रव्ये सुद्धा पिकांना उपलब्ध होतात उदा. उस, कांदा, गहू, मका पिकांना जमिनीतून भूसुधारक म्हणून वापरावे

सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन

सिंचनासाठी वापरण्यात येण्याऱ्या पाण्याचे परीक्षण आज एक काळाची गरज बनले आहे. पाणी हे फक्त पिकाच्या वाढीशी संबंधित नसून त्याचे दृश्य अदृश्य परिणाम हे जमिनीच्या रासायनिक तसेच भौतिक गुणधर्मांवरती दिसून येतात . गत काही वर्षांमध्ये क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन हि शेतकऱ्यांसमोरची मोठी समस्या बनले आहे . ही समस्या मुख्यत्वे पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये भेडसावत आहे. काळ्या जमिनीत ही समस्या तीव्र प्रमाणात भेडसावत आहे.

क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात

 • जर पाण्याचा सामू ८.० पेक्षा कमी असेल व क्षारता १.० डेसी सायमन पेक्षा कमी असेल तरच ठिबक द्वारे सिंचनाची व्यवस्था करावी.
 • पाण्यात मध्यम प्रमाणात क्षार असतील व चुनखडी कमी असेल तर पाणी जीप्समच्या पिशवीतून प्रवाहित करावे.
 • जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा.
 • पिकाच्या गरजेनुसार व योग्य प्रमाणात ओलित करावे.
 • पिकांची फेरपालट करावी.
 • आच्छादकांचा वापर करावा उदा. ऊसाचे पाचट, पॉलिथिन पेपर इ.
 • पिकांची लागवड सरीवरंब्याच्या बगलेत करावी म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा पिकाशी थेट संपर्क येणार नाही.
 • अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य अंतरावर चर खणावेत.
 • क्षारयुक्त पाण्याबरोबर गोडे पाणी उपलब्ध असल्यास आलटून पालटून दोन्ही प्रकारचे पाणी वापरावे.
 • शिफारशीपेक्षा २५ टक्के अधिक नत्र पाणी अल्कधर्मी असल्यास दयावे.
 • क्षारांचा ताण सहन करणारी पिके घ्यावीत. उदा. गहू, कापूस, बार्ली (सातू) करडई, सुर्यफुल, शर्कराकंद, पालक इ. तसेच हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढवावे.

काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा वापर व संरक्षित शेती

जागतिक हवामान बदल लक्षात घेता बिगर हंगामी पिके शेड्नेट किंवा हरितगृहात घेणे , तसेच ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा पिक वाढीच्या अवस्थेनुसार वापर करून पाण्याची व खतांची बचत करणे सोबतच भरघोस उत्पन्न मिळवणे हे काटेकोर शेतीद्वारे शक्य होते. विशेषतः कोरडवाहू भागात मृदेची कमीत कमी मशागत करून मयुदेची धूप थांबवणे व सेंद्रिय कर्ब वाढवणे संरक्षित शेती द्वारे शक्य होते. संरक्षित शेतीद्वारे पाणी जागीच अडवले जाऊन भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मदत होते.

मृदेचे व पाण्याचे प्रदूषण नियंत्रण

शहरी सांडपाण्याचा भाजीपाला पिकांमध्ये मर्यादित वापर केला पाहिजे, जेणेकरून भूजल साठ प्रदूषित होणार नाही. याच सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरले गेल्यास मृदा प्रदूषण नियंत्रणात त्याची मदत होते.

जमिनीची खोली व पिकांचे व्यवस्थापन

फळझाडांचे उत्पादित आयुष्य हे प्रामुख्याने जमिनीच्या खोलीवर अवलंबून असते त्यामुळे फळबाग लागवडीसाठी जमिनीची योग्य निवड अतिशय महात्वाची असते. विशेषतः फळबाग लागवडीसाठी साठी मध्यम ते खोल, चांगल्या निच-याची तसेच इतर अल्पायुषी पिकांसाठी हलक्या जमिनीची निवड करावी. मात्र निवड करताना जमिनीच्या सर्व थरांमध्ये मुक्त चुनखडीचे प्रमाण १० % पेक्षा कमी असावे.

कृषी हवामान विभाग निहाय पिकांचे व्यवस्थापन

जैवविविधतेची जपणूक करण्यासाठी त्या त्या विभागातील जमीन हवा पाणी या नैसर्गिक संसाधाननुसार विविध पिकपद्धतीचा, आंतरपिकांचा वापर तसेच फळपिकांची लागवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.

लेखक शुभम दुरगुडे हे मृदाविज्ञान आचार्य पदिवीचे विद्यार्थी आहेत. डॉ. अनिल दुरगुडे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत. मो. ९४२०००७७३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *