जिल्हा परिषद अध्यक्षांची कृषी मंत्र्यांकडे मागणी

पुणे : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १५ हजार हेक्टरवरील लागवड केलेले पीक वाहून गेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्लागवड करता यावी, म्हणून १० हजार किलो कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

कांदा रोपवाटीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा रोप टाकणीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र जिल्ह्यात कांदा बियाणांचा तुडवडा आहे. उपलब्ध असलेले बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी कांदा बियाणे मागणीसाठी कृषिमंत्री दादा भुसे यांना पाठवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष पानसरे यांनी दिली.

जिल्हयात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे खरीपातील उभ्या पिकांचे तसेच रब्बी हंगामातील नवीन पिकांचे देखील नुकसान झाले आहे. कांदा पिकाच्या नवीन लागवडीचे जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील तयार रोपवाटिकेतील कांदा रोपे व लागवडीमधील कांदा रोपे वाहून गेली. तसेच लागवड केलेली रोपे अति पावसामुळे खराब झाली आहेत. सध्या पावसाच्या उघडीपीनंतर शेतक-यांनी पुन्हा रोपे टाकुन कांदा लागवडीची तयारी केलेलो आहे.

बाजारामध्ये कांदा बियाणे उपलब्ध नाही. जे बियाणे उपलब्ध आहे, ते महाग आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. त्यामुळे इतर राज्यात कांदा बियाणे शिल्लक असल्यास पुणे जिल्हयासाठी १० हजार किलो (१०० क्विंटल) कांदा बियाणे उपलब्ध करावे, अशी मागणी कृषी खात्याकडे करण्यात असून, याबतचे कृषिमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!