हंगामात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज

पुणे : यंदाच्या हिवाळा हंगामात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्रासह, उत्तर भारतात गारठा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर, वायव्य, मध्य भागासह पूर्व भागातील काही उपविभागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे २०१६ पासून उन्हाळा आणि हिवाळा हंगामात उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर करण्यात येतो. मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम प्रारूपाच्या (मॉडेल) आधारे हवामान विभागाने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या तीन महिन्यातील तापमानाचा अंदाज वर्तविला आहे.

त्यानुसार यंदाच्या हिवाळ्यात देशाच्या उत्तर, वायव्य, मध्य भागासह पूर्व भागातील काही उपविभागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. तसेच ईशान्य भारत, पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारतातील उपविभागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानाचा अंदाज व्यक्त करताना दक्षिण आणि मध्य भारतातील काही उपविभाग वगळता देशात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागातर्फे दर आठवड्याला कमाल व किमान तापमानाचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे.

मराठवाडा, विदर्भ अधिक गारठा ?

हवामान विभागाने प्रसिध्द केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी इतके राहणार असून, कोकण विभागात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी, कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रशांत महासागरात ला-निना स्थिती

मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातीस समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान सरासरी पेक्षा कमी असून, या भागात सध्या मध्यम ला-निना स्थिती आहे. हिवाळा हंगामात या भागात मध्यम ला-निना स्थिती कायम राहण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

One thought on “यंदाच्या हिवाळ्यात गारठा अधिक राहणार ?”
  1. I am genuinely thankful to the holder of this site who has shared this impressive piece of writing at at this place. Amelia Luce Daugherty

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!