तामिळनाडू, केरळला चक्रीवादळाचा इशारा

पुणे : देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात वादळामागुन साखळी सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात आलेल्या “गती” आणि “निवार” वादळांपाठोपाठ श्रीलंकेच्या पूर्वेकडील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मंगळवारी (ता.१) या भागात चक्रीवादळाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊन राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशाची घट होणार आहे.

अरबी समुद्रात तयार झालेले “गती” चक्रीवादळ सोमालियाकडे सरकून रास बिन्नाहजवळ निवळून गेले. “गती” तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात मंगळवारी (ता. २४) आलेल्या “निवार” चक्रीवादळाने तामिळनाडू, आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला तडखा दिला. जमीनीवर येताच हे वादळ आंध्रप्रदेशमध्ये विरून गेले.

दरम्यान विषुवृत्ताजवळील हिंद महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली. रविवारपर्यंत (ता. २९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. सोमवारी (ता. ३०) दुपारी श्रीलंकेच्या त्रिंकोमलीपासून ७१० तर तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून ११२० किलोमीटर पुर्वेकडे हे क्षेत्र सक्रीय होते.

ही वादळी प्रणाली आणखी तीव्र होऊन मंगळवारी (ता. १) चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. बुधवारी (ता. २) सायंकाळपर्यंत हे चक्रीवादळ श्रीलंका देशाची भूमी ओलांडून तामिळनाडूच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ही प्रणाली अरबी समुद्राच्या कोमोरीन भागाकडे येणार आहे. त्या पाठोपाठ दक्षिण अंदमान समुद्रात पुन्हा नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!