पुणे : राज्यात दोन दिवसांपासून वादळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे काढणीस आलेली व काढून ठेवलेली खरीपाची पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनी, कृषी विभाग, बँक यांना त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. याबाबत कृषी विभागाने कार्यपद्धती विषयी माहिती मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान व नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान यासाठी विमा संरक्षण दिले जाते. राज्यातील काही जिल्हयांमध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्याने पिकांचे काढणीनंतर नुकसान होण्याची शक्यता आहे. हंगाम कालावधीत अधिसुचित क्षेत्रातील शेतात पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकांसाठीच, कापणी पासून जास्तीत जास्त दोन आठवडयांपर्यंत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे.

काढणीपश्चात नुकसान जोखिमअंतर्गत नुकसान भरपाईचे निकष

  • अधिसुचित विमा क्षेत्रात अधिसुचित पिक घेणाऱ्या व पूर्वसुचना दिलेल्या शेतकऱ्यांसाठी सदर तरतुद वैयक्तिक स्तरावर लागु राहील.
  • जास्तीत जास्त दायित्व हे अधिसुचित पिकाच्या बाधित क्षेत्राच्या विमा संरक्षित रक्कमेएवढे राहील.
  • जोखिमेचा धोका घडेपर्यंत पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षित रकमेच्या अधिन राहील.

पीक नुकसानीची माहिती कळविण्याची पध्दत

  • शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची पुर्वसुचना क्रॉप इंशुरंन्स अॅप (Crop Insurance App) अथवा टोल फ्री क्रमांकाद्वारे विमा कंपनीस, संबंधीत बँक व कृषि विभागास देण्यात यावी.
  • सर्वप्रथम प्राधान्याने “क्रॉप इंशुरंन्स अॅप” या मोबाईल ॲपद्वारे पुर्वसुचना देण्यात यावी. मोबाईलन ॲपद्वारे शक्य न झाल्यास संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक वर सुचना देण्यात यावी, अथवा सदर आपत्तीची माहिती बँक/कृषि विभाग यांना दयावी. सदरची माहिती संबंधित बँक/विभागाकडून संबंधित विमा कंपनीस तात्काळ पुढील ४८ तासात पाठवण्यात येईल.
  • इतर नोंदणी स्त्रोतांकडून प्राप्त पुर्वसुचनांची नोंद संबंधित कार्यालयाने वा विमा कंपनीने राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर करावी.

नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

नुकसान भरपाईबाबत पुर्वसुचना मोबाईल ॲपद्वारे कळविली नसल्यास शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज खालील माहिती कागदपत्रांसह विमा कंपनीस विहित कालावधीत सादर करणे आवश्यक आहे,

  • शेतकऱ्याचे नाव
  • बाधित सर्व्हे नं.
  • पिकनिहाय बाधित क्षेत्र
  • पोर्टल वरील शेतकरी अर्ज क्रमांक
  • मोबाईल नं.,
  • कर्जदार शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड (KCC A/c No)
  • बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी बचत खाते नं.
  • विमा हप्ता भरल्याचा पुरावा.

शेतकरी परिपुर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो, परंतु अर्जातील उर्वरीत माहिती ७ दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक.

पीक नुकसानीचा पुरावा म्हणून Crop Insurance App या मोबाईल ॲपद्वारे नुकसानग्रस्त क्षेत्राचे छायाचित्रे विमा कंपनीस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पीक नुकसानीची पुर्वसुचना देण्यासाठीचे “Crop Insurance App” हे मोबाईलॲप Google Play Store वरुन download करावे.

पीक नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समितिमार्फत करण्यात येईल ज्यात विमा कंपनीचा पर्यवेक्षक, शासन प्रतिनिधी आणि संबंधित शेतकरी यांचा समावेश राहील. संयुक्त समितीने विहीत प्रमाणात केलेल्या नमूना सर्वेक्षणाचे आधारे विमा कंपनीमार्फत नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल.

काढणी पश्चात जोखिमकरीता, जर बाधित क्षेत्र हे अधिसुचित विमा क्षेत्राच्या २५ टक्के पर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर व २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकऱी (विमा योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसान विहित वेळेत पूर्वसूचना दिलेले) नुकसान भरपाईस पात्र होतील.

खरीप हंगाम २०२० मध्ये अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनींचे टोल फ्री क्रमांक

समाविष्ट जिल्हेनियुक्त विमा कंपनीटोल फ्री क्रमांक
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर,
सोलापूर, जळगाव, सातारा
भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं.लि.18001037712
परभणी, वर्धा, नागपूर, वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार,
जालना, गोंदिया, कोल्हापूर
रिलायंन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि.18001024088
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोलीइफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स कं.लि.18001035490
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला,
धुळे, पुणे
एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि.18002660700
उस्मानाबादबजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं.लि.18002095959
लातुर, बीडभारतीय कृषि विमा कंपनी18004195004

काढणी पश्चात जोखिम अंतर्गत उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करणे बाबत जिल्हा प्रशासन व सर्व संबंधित विमा कंपनींना सुचना देण्यात आल्या आहेत. विमा कंपनीमार्फत सर्वेक्षणासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *