राज्यात गुरूवारपासून पावसाचा अंदाज : उन्हाचा चटाकाही वाढणार
पुणे : हिवाळा संपून उन्हाच्या झळा वाढू लागताच राज्यात पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला झाला आहे. गुरूवारपासून (ता.१८) राज्याच्या विविध भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उन्हाचा चटका वाढणार असल्याने कमाल तापमानात वाढ होणार आहे.
देशभरात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत पडणारा पाऊस पूर्वमोसमी समजला जाते. राज्याच्या विविध भागात सध्या पहाटे गारठा, दुपारी उन्हाचा चटका, ढगाळ हवामानासह असह्य उकाडा जाणवत आहे. शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपूरी येथे तापमानाचा पारा ३९ अंशांच्या वर जात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. नागपूर, वर्धा, गाेंदियासह विदर्भात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली.
सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रपासून तामिळनाडूच्या लगतच्या समुद्रातील कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. .यातच पश्चिम बंगालपासून विदर्भापर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडीत झाल्याने पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. गुरूवारपासून (ता. १८) मध्य भारतसह महाराष्ट्राच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जवळपास आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत आहेत.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.६, जळगाव ३७.९, कोल्हापूर ३५.१, महाबळेश्वर ३१.४, मालेगाव ३८.६, नाशिक १४.५, सांगली ३६.४, सातारा ३५.७, सोलापूर ३८.२, मुंबई (कुलाबा) ३०.८, सांताक्रूझ ३३.४, अलिबाग ३०.९, डहाणू ३१.०, रत्नागिरी ३२.४, ठाणे ३५.२, वेंगुर्ला २३.२, औरंगाबाद ३६.१, परभणी ३७.४, अकोला ३९.०, अमरावती ३८.२, बुलढाणा ३७.२, ब्रह्मपूरी ३९.१, चंद्रपूर ३९.१, गोंदिया ३६.०, नागपूर ३७.२, वर्धा ३८.४, यवतमाळ ३८.७.