‘ई.एल.एस.एस.’ टॅक्स सेवर फंडामध्ये गुंतवणूक करा

करबचतीसाठी आयकराच्या कलम ८० क अंतर्गत उपलब्ध असलेली लोकप्रिय गुंतवणुकीची साधनांमध्ये प्रामुख्याने पी पी एफ, विमा, पी एफ, एन एस सी, बँकेतील ५ वर्षाची मुदत बंद ठेव, आणि म्युच्युअल फंड मधील ई एल एस एस योजना यांचा समावेश होतो. खर पाहता करबचतीचे नियोजन हे नेहमी वर्षाच्या सुरुवातीला करायला पाहिजे. मात्र, पूर्वकल्पना असतानाही बऱ्याचदा मार्च महिना आला आणि ऑफिसमधून करबचतीच्या पावत्या मागितल्या गेल्या आणि मग प्रत्येकातला सुप्त ‘इन्वेस्टमेंट गुरु’ जागा होतो.

करबचतीसाठी आयकराच्या कलम ८० क अंतर्गत आपण रु. १,५०,०००/- ची गुंतवणूक करू शकतो. पारंपरिक पर्याय हे मुख्यत्वे कर बचत हा उद्देश समोर ठेवतात. परंतु, नेहमीच्या किंवा पारंपारिक पर्यायांना बगल देऊन कर बचतीसोबत संपत्ती निर्मितीची क्षमता असलेल्या म्युच्युअल फंडातील इक्वीटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) फंड्सचा कर नियोजनात समावेश हा सक्षम आणि ग्राहक केंद्रित पर्याय अलीकडे समोर आला आहे. त्याच महत्वाचं कारण म्हणजे पारंपारिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, वाढणारी महागाई, आणि सध्या पगारदार व्यक्तीना बंद झालेली पेन्शन यांचा संयुक्त परिणाम हा होय.

ई.एल.एस.एस. योजने बाबत बोलायचं झालं तर कलम ८० सी अंतर्गत उपलब्ध सर्वच गुंतवणुकीच्या साधनांमध्ये सर्वात कमी ‘लॉक-इन’ कालावधी या योजनेतच आहे. फक्त ३ वर्षे एवढा कमी ‘लॉक-इन’ कालावधी आणि सोबत दोन अंकी महागाईला संतुलन राखणारा परतावा ही वैशिष्ट्ये निश्चितच या योजेनेला सर्वोत्कृष्ट बनवतात. सलग तीन वर्षे पैसे भरून नंतर याच योजनेतील पैसे काढून परत याच योजनेत गुंतवल्यास तीन वर्षानंतर तुम्हाला नवीन गुंतवणूक न करताही कर बचतीचा लाभ घेणे शक्य होऊ शकते किंवा प्रत्येक वर्षी कर बचतीची गुंतवणूक करून निवृत्ती पश्चात त्याचा लाभ घेता येतो. हे सर्व करत असताना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारामध्ये लोकप्रिय असलेल्या एस आय पी या मासिक गुंतवणुकीद्वारे सुद्धा गुंतवणूक करू शकतो आणि त्यामुळे मिळणारा रुपी कॉस्ट अव्हरेजिंगचा फायदा घेता येतो.

एका दगडात दोन पक्षी मारणे’ अशी एक सर्वश्रुत म्हण आहे. त्याच्याही पुढे जाऊन एका दगडात चार पक्षी मारणे हे काम आपण या योजनेद्वारे करू शकतो. करनियोजन, संपत्ती निर्मिती, आकर्षक परतावा, आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन असे चार पक्षी ही योजना एका सुज्ञ निर्णयातून मिळवून देते. अशी ई एल एस एस योजना आपल्या कर नियोजनात निश्चितच असायलाच हवी. चांगला निर्णय कधीही चांगलाच परिणाम देतो आणि असा निर्णय वेळेत घेणे आवश्यक असते, मग लागा कामाला.

लेखक वसंत कुटे हे कर सल्लागार आहेत. संपर्क : ९४२३५७५४६६, ईमेल : vasantkute222@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!