पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे शनिवारी (ता.३) दुपारी १ वाजता म्हात्रे पूलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षण विषयामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी विचारवंतांना एकत्रित करुन आमदार विनायक मेटे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

मराठा आरक्षणाविषयी एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने व सर्वोच्च न्यायालयासमोर एकत्रित भूमिका मांडण्याकरीता विचारमंथन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला साता-याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत, अ‍ॅड.उज्वल निकम, हर्षद निंबाळकर, प्रतापराव जाधव तसेच मराठा आरक्षणाविषयी न्यायालयातील संबंधित वकिलांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांना देखील आमंत्रित केले आहे.

आमदार विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाची स्थगिती उठविणे व सुनावणी लवकर सुरु करणे, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजातील तरुण व विद्यार्थ्यांच्या नोकरी आणि शिक्षणाचा प्रश्न सोडविणे याशिवाय सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा आंदोलनातील खटले मागे घेणे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याकरीता बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. सर्वांचा या एका मंथनातून एक विचार व्हावा, असा प्रयत्न असणार आहे. पुण्यातील बैठकीच्या नियोजनामध्ये भरत लगड, तुषार काकडे, किरण ओहोळ यांनी सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!