राजस्थान, पंजाबमधून परतीचा प्रवास सुरू

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम हलविला आहे. सोमवारी (ता. २८) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत मॉन्सून वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून १७ सप्टेंबर रोजी माघारी फिरणे अपेक्षित होते. मात्र तब्बल ११ दिवस उशीराने मॉन्सूनने वारे माघारी फिरलेले आहे. देशाच्या वायव्य भागात केंद्राकडून बाहेरच्या दिशेला वारे वाहणारी चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती (अॅण्टी सायक्लोनिक सर्कुलेशन) तयार झाली आहे. यातच या भागात हवेतील ओलावा (आर्द्रता) कमी झाला आहे. यावरून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पंजाबच्या अमृतसर, भटिंडा, राजस्थानच्या हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर या भागापर्यंत मॉन्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हरियाणा, दिल्ली, चंडीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सून वारे परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार यंदा १ जून रोजी देवभूमी केरळमध्ये दाखल झाला. ११ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झालेल्या मॉन्सूनने १४ जून रोजी पुर्ण राज्य व्यापले. उत्तरेकडे वेगाने वाटचाल करत १२ दिवस आगोदरच संपुर्ण देशात मजल मारली. महाराष्ट्रसह देशभरात मॉन्सूनने सामधानकारक हजेरी लावली आहे. सोमवारपर्यंत (ता. २७) देशात ९५१.३ मिलीमीटर (१०९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, तसेच ईशान्य भारतातील नागालँड, मनिपूर, मिझोराम वगळता राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडला आहे.

मॉन्सूनच्या राजस्थानातील परतीची स्थिती

वर्ष परतीचा दिवस
२०१५ ४ सप्टेंबर
२०१६ १५ सप्टेंबर
२०१७ २७ सप्टेंबर
२०१८२९ सप्टेंबर
२०१९ ९ ऑक्टोबर
२०२० २८ सप्टेंबर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!