पुणे : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरूवात केली आहे. मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशूंना ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी केले आहे.

कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते शुभारंभ मावळ तालुक्यातून लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, तालुका विस्तार अधिकारी, डॉ. देशपांडे, उपसरपंच विशाल वहिले, पै.सुनील दंडेल, भाऊसाहेब ढोरे, सुनील चव्हाण, सुजित माझिरे, अक्षय रौधळ, डॉ.परंडवाल उपस्थित होते. यावेळी जनावरांना बिल्ले लावून व लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले.

लाळ्या खुरकत हा रोग विषाणुजन्य असून गाय, बैल, म्हैस आदी पशूंसाठी घातक असणार्‍या रोगावर ही लस फायद्याची आहे. जनावरांना ताप येणे, तोंडाला फोड येऊन जखमा होणे, खुरांना जखमा होणे अशी त्याची लक्षणे आहेत. त्यामुळे जनावरे काही खाऊच शकत नसल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन पशुधन दगावते.

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ही लस उपलब्ध असणार आहे. या लाळ्या खुरकत रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे लसीकरण महत्वाचे असून, ही लस दिली नाही तर जनावरांचे खाणे-पिणे बंद होते. जनावरांना ताप येतो. दुधाळ जनावरांत दूधउत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्षातून दोनदा लाळ्या खुरकतचे लसीकरण करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *