पुणे : मका पिकावरील लष्करी अळी अत्यंत विध्वंसक कीड आहे. या किडीचे मका आवडते पीक असून, या शिवाय ज्वारी, ऊस, गहू व इतर पिकांवरही ती उपजीविका करू शकते. यामुळे ही कीड जास्त काळ सुप्त अवस्थेत न जाता हिचा जीवनचक्र कायम चालू राहतो. एका वर्षात आळीच्या ७ ते ८ पिढ्या होत असल्याने यांची संख्या भौमितिक पद्धतीने वाढत जाते. या किडीचा समावेश लेपिडॉप्टेरा(Lepidoptera) गणाच्या नॉक्ट्युइडी (Noctuidae) कुळात होतो. Mythimna separate, Spodoptera sp या महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या लष्करी अळीच्या प्रमुख प्रजाती ( Species) आहेत.

मका लागवड केल्यानंतर ८ ते १० दिवसांत मक्यावरील लष्करी अळींचा पतंग मक्याच्या पहिल्या पानावरील रोपावर अंडी देतो. मादी पंतग एकावेळी २००-३०० अशा पध्दतीने ७ ते ८ वेळा २००० अंडी देते. तेथून पुढे २-३ दिवसात अळींची पहिली अवस्था बाहेर पडते. पुढील ४-५ दिवसात अळी दुसरी अवस्था पार पडते. तर १८-१९ दिवसांनतर ही अळी तिसरी अवस्था पार करते. अळी अवस्था २१-२८ दिवस टिकते व त्यानंतर अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था ८-१० दिवस टिकते. जीवनचक्र पुरे होण्यास ५-६ आठवड्यांचा काळ लागतो.

या अळ्या पानांच्या कडांकडून मध्य शिरेकडे पाने खातात व मधल्या पोंग्यात लपून बसतात. त्यांची संख्या फारच मोठी असल्यामुळे संपूर्ण पिकाचा त्या फडशा पाडू शकतात. त्यावरूनच त्यांना ‘ लष्करी अळी ‘ हे नाव पडले आहे. त्या एका शेतातून दुसऱ्या शेतात घुसतात. अळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ४-६ दिवसात हि अळी संपूर्ण मका पिक फस्त करून टाकते. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्यासाठी केलेले नियोजन चुकते. तसेच अळी युक्त मका खाण्यात आल्यास जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.

सर्वसाधारणपणे या किडीसाठी थायोमिथॉक्झॅम १२.६० टक्के, लैमडा सायहॅलोथ्रीन ९.५० टक्के, ५ मिली प्रती १० लिटर पाणी, क्लोरअन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के, ४ मिली प्रती १० लिटर पाणी, स्पीनोसॅड ३ मिली, प्रती लिटर पाणी या कीटकनाशकापैकी कुठल्याही एका किडनाशकाची फवारणी केली जाते. यानंतर ३ आठवडे या मका चाऱ्याचा पशुधनास खाण्यासाठी उपयोग होत नाही. तसेच या कीटकनाशकांचे अवशेष (Residue) मका चाऱ्यामध्ये येऊन पशुधनास विषबाधा होऊ शकते.

या किडीचे इतर असंख्य परजीवी कीटक शत्रू आहेत. काही परजीवी माश्या (उदा., विंथेमिया क्वाड्रिपुस्टुलेटा) आपली अंडी लष्करी अळ्यांच्या पाठीवर (विशेषतः डोक्याकडे ) घालतात. या अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या लष्करी अळ्यांच्या पाठीला भोके पाडून आत शिरतात व त्यामुळे त्या मरतात. बरेच भुई भुंगेरे व परजीवी गांधील माश्या लष्करी अळ्या खातात. अतिसूक्ष्म, काळा गांधील माशी सारख्या कीटक टेलीनोमस मिनिमस लष्करी अळ्यांच्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालतो. कीटकनाशकांच्या वापरामुळे या कीटकशत्रूंचाही नाश होतो व लष्करी अळीचे नियंत्रण करणे ही मोठी समस्या बनते.

लष्करी अळीचे जैविक नियंत्रण

सजीव सृष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची एक पध्दत आहे.ती म्हणजे जैविक नियंत्रण.निसर्गात काही बुरशी आहेत ज्या किडीवर उपजीविका करून त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात. अशा बुरशींना परोपजीवी बुरशी म्हणतात. ज्याचा वापर कीड नियंत्रणासाठी केला जातो. बवेरिया बसियाना (Beauveria bassiana), नोमुरीया रीलायी (Nomuraea rileyi), मेटारझीयम अनिसोपली (Metarhizium anisopliae), व्हरटीसिलीयम लेकॅनी (Verticillium Lecanii) या जैविक कीड नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रमुख बुरशी आहे.

वळूमाता प्रक्षेत्र कोपरगाव येथे १५ जानेवारीनंतर जवळपास १ हेक्टर क्षेत्रावर चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल मका पेरणी करण्यात आली होती. १५ दिवसानंतर या मकेवर मोठया प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. ही कीड नियंत्रणासाठी बवेरिया बसियाना (Beauveria bassiana) या बुरशीचा वापर करण्यात आला. ५ फेब्रुवारी रोजी बवेरिया बसियाना (Beauveria bassiana) बुरशी ५ ग्राम /लिटर पाण्यातून फवारणी केली. त्यांनतर पाच दिवसांनी पाहणी केली असता छोटया अवस्थेतील सर्व अळ्या नियंत्रणात आल्या होत्या तसेच मोठया अळ्यांची हालचाल मंदावली होती. तसेच पिकाला हिरवेपणा येऊन वाढ सुरु झाली होती.

पहिल्या फवारणी नंतर पुन्हा १५ दिवसांनी दुसरी फवारणी केली .त्यांनतर १० दिवसांनी पुन्हा पाहणी केली असता, मका पिकावरील लष्करी अळी पूर्ण नियंत्रणात आली होती. तसेच पिकावरील अंडी वेचून खाणारी मित्र कीड लेडी बर्ड बीटल मोठ्या प्रमाणात आढळून आली. ज्या झाडांवर ही मित्रकीड आढळून आली. त्याची वाढ अतिशय उत्तम आढळून आली. दुसऱ्या फवारणी नंतर पुन्हा १५ दिवसांनी फवारणी केली असता, लष्करी अळी पूर्ण नष्ट झालेली दिसली. मका पिकाची उत्तम वाढ दिसून आली. जैविक नियंत्रण पद्धती नियमित वापरल्यानंतर प्रक्षेत्रावर नंतरच्या मका प्लॉटसवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत आहे.

तिसऱ्या फवारणीनंतर मका

सारांश
प्रक्षेत्रावर /शेतात मका पिकाची पेरणी केल्यानंतर १० ते १५ दिवसात बवेरिया बसियाना (Beauveria bassiana), नोमुरीया रीलायी (Nomuraea rileyi), मेटारझीयम अनिसोपली (Metarhizium anisopliae), व्हरटीसिलीयम लेकॅनी ( Verticillium Lecanii) या पैकी कुठल्याही बुरशीची ५ ग्राम/लिटर या प्रमाणात फवारणी करावी. त्यानंतर दर १५ दिवसांनी २ फवारण्या कराव्यात. लष्करी अळीचे नियंत्रण होऊन मित्र किडींचे प्रमाण वाढते. या पद्धतीने आपण आपल्या पशुधनास रसायन मुक्त पौष्टिक चारा उपलब्ध करू शकतो.

डॉ. संजय काशिनाथ कुमकर, व्यवस्थापक, वळूमाता प्रक्षेत्र, कोपरगाव, जि. नगर, (मो.९९६०९२२४०५)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *