पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत ११० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी (ता. १) जाहीर केला. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कमी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरणार आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सप्टेंबर महिन्यातील मॉन्सूनच्या पावसाचा अंदाज जाहीर केला.

१९६१ ते २०१० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीचा विचार करता सप्टेंबर महिन्यात देशात १७० मिलीमीटर पाऊस पडतो. जून ते ऑगस्ट या कालावधीत देशात सरासरीच्या उणे ९ टक्के पाऊस पडला असून, सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे हंगामातील पाऊस सरासरी गाठेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक ते सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा (सौजन्य : हवामान विभाग)

कोठ अधिक, कोठे कमी
मध्य भारतात चांगल्या पावसाचे संकेत असून, महाराष्ट्राचा विचार करता विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक तर मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नकाशानुसार यंदाच्या हंगामात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी असलेल्या मध्य महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे.

‘एल निनो’ सर्वसामान्य, आयओडी नकारात्मक
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य मात्र थंड एल निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार सप्टेंबर महिन्यात ही स्थिती कायम राहणार आहे. प्रशांत महासागराचे थंड होत असलेले तापमान पाहता, मॉन्सूनच्या अखेरीस किंवा हंगामानंतर ‘ला निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) सध्या नकारात्मक आहे. मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, नकारात्मक आयओडी चांगल्या पावसासाठी पोषक ठरतो.

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कसे राहील, या प्रश्नाला उत्तर देताना, डॉ. मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, कमी क्षेत्रावरील अंदाज वर्तविणे आव्हानात्मक काम आहे. महाराष्ट्रातील कोकण, घाटमाथा, विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र अंतर्गत मध्य महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: