पुणे : राज्यात गेले काही दिवस धुमाकुळ घालणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. उद्या (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून, गुना, सतना, अंबिकापूर, परादीप ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्रात असलेली परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) निवळून गेलेली आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उद्या (ता. १०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा “येलो अलर्ट” हवामान विभागाने दिला आहे.

रविवारपासून पुन्हा पाऊस वाढणार
मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत (ता.११) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. मध्य भारताकडे सरकताना ही प्रणाली तीव्र होणार असून, त्यामुळे रविवारपासून (ता.१२) पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.
कोकण, विदर्भात जोरदार हजेरी
राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील पन्हाळा येथे सर्वाधिक १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक पुणे, सातारा, आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. उर्वरीत राज्यात हलक्या सरी पडल्या.
गुरूवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) :
कोकण :
रायगड : कर्जत ७७, माथेरान ८३, पेण ४३, पोलादपूर ४७, तळा ५४.
रत्नागिरी : दापोली ४०, मंडणगड ४५.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग ४४, कुडाळ ४०, सावंतवाडी ६६, वेंगुर्ला ५८.
ठाणे : कल्याण ४४, उल्हासनगर ५३.
मध्य महाराष्ट्र :
धुळे : साक्री ३३.
जळगाव : अंमळनेर ४३.
कोल्हापूर : गगणबावडा ६५, पन्हाळा १०८, राधानगरी ३१.
नाशिक : देवळा ४५, इगतपुरी ४४.
पुणे : लोणावळा कृषी ५१, पौड ३२, वेल्हे ४१.
सातारा : जावळीमेढा ३१, महाबळेश्वर ७०.
विदर्भ :
अकोला : मर्तिजापूर ३३, तेल्हारा ३८.
अमरावती : अमरावती ५३, बटकुली ४०, चांदूर रेल्वे ५५, नांदगाव काझी ५२, तिवसा ४९.
नागपूर : हिंगणा ३४, कळमेश्वर ३६, काटोल ७४, नरखेडा ६८, पारशिवणी ३२, रामटेक ३०, सावनेर ४८.
वर्धा : आर्वी ६०, आष्टी ५४, खारंघा ७७.