पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. आज (ता. २५) या भागात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहे. उद्या (ता. २६) संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला असून, ही प्रणाली महाराष्ट्राकडे येण्याची चिन्हे आहेत.
बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढली असून, त्याचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. शुक्रवारी (ता. २४) रात्री ही प्रणाली आडिशाच्या गोपाळपूरपासून अग्नेयेकडे ६७० किलोमीटर, तर आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणमपासून ७४० किलोमीटर पुर्वेकडे समुद्रात होती.

या प्रणालीची तीव्रता वाढत असून, आज (ता. २५) दुपारपर्यंत किनाऱ्यालगत चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता आहे. ही संभाव्य वादळी प्रणाली आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या विशाखापट्टणम, गोपाळपूर आणि कलिंगापट्टणम जवळ किनाऱ्याला धडकण्याची संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात (ता. २५) आज उंच लाटा उसळण्याची शक्यता असून, ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्या आला आहे. उद्या (ता. २६) सायंकाळपर्यंत ही वादळी प्रणाली किनाऱ्याकडे येणार असून त्यावेळी ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह, पूर्व किनाऱ्यावरील राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भाकडे येणार वादळी प्रणाली
उपसागरातील वादळी प्रणालीचा संभाव्य मार्ग पाहता उद्या (ता. २६) किनाऱ्याला धडकून, उत्तर आंध्रप्रदेश, दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणातून सोमवारपर्यंत (ता २७) महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाकडे येण्याचे संकेत आहेत. किनाऱ्याला धडकल्यानंतर या प्रणालीची तीव्रता कमी होत जाणार असलीतरी, या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.