पुणे : राज्यात टोमॅटो पिकावर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होत आहे. विषाणू प्रादुर्भाव व्यवस्थापनासाठी, रोगाचे नियंत्रण उपाययोजनेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिले आहेत.

विषाणू प्रादुर्भाव व्यवस्थापनाबाबत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बेबिनारद्वारे झाली. या बैठकीस फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, गुणनियंत्रण कृषी संचालक दिलीप झेंडे, पुणे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, आयआयएचआर, बेंगलोरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा रेड्डी यांच्यासह तज्ज्ञ, बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी टोमॅटो पिकावरील विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत सद्यस्थिती, करण्यात आलेली कार्यवाही व पुढे करावयाचे नियोजन याबाबत बैठकीत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.

बैठकीत सर्व तज्ञ समवेत चर्चा करून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे ठरले.

 • भाजीपाला रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकांनी टोमॅटो बियाणास बीज प्रक्रिया करूनच रोपे तयार करावीत.
 • सदर रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीड प्रतिबंधात्मक नेट मध्ये रोपांची लागवड करुन योग्य त्या वयाची (२० दिवसांपेक्षा मोठी व २८ दिवसांपेक्षा लहान ) टोमॅटोची रोपे रोपवाटिकेतुन शेतकऱ्यांना विक्री करावी.
 • टोमॅटो बियाणे उत्पादक कंपन्यांनी त्यांनी उत्पादित केलेले टोमॅटो पिकाच्या जातीची ५० रोपे विभाग प्रमुख वनस्पती विकृतीशास्त्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडे उपलब्ध करून द्यावे.
 • राहुरी कृषी विद्यापीठात टोमॅटो पिकाच्या जातीनिहाय विविध रोगाच्या प्रादुर्भावाबाबत सविस्तर अभ्यास करून त्याचा निष्कर्ष सादर करावा.
 • टोमॅटो मोझॅक व्हायरस व इतर विषाणूचा प्रसार मावा,फुलकिडे व पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीद्वारे होत असल्याने सदर किडीचे नियंत्रणाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरीदाबाद यांनी शिफारस केलेल्या लेबल क्‍लेम औषधांचा वापर करण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
 • लेबल क्लेम औषध तसेच टोमॅटोवरील किडी व रोगांचे नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या लेबल क्‍लेम औषधांची यादी सर्वांना त्वरित उपलब्ध करुन द्यावी.
 • ज्या भागात टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्या भागातील शेतकऱ्यांची व्हेजनेटद्वारे नोंदणी करण्याकरिता संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी खास मोहीम राबवावी.
 • नोंदणीकृत व इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी समूह क्षेत्रामध्ये कृषि विदयापीठाचे शास्त्रज्ञ,कंपन्याचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या क्षेत्रीय भेटी व प्रशिक्षण आयोजित करून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करावे.
 • टोमॅटो या पिकाचा फलोत्पादन पिकावरील किडी व रोगाचे व्यवस्थापन व सल्ला (हॉर्टसॅप) या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत फिक्सड प्लॉट चे सर्व्हेक्षण करून प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
 • टोमॅटो पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेमधील नमुने घेऊन त्याचे विषाणू संदर्भात तपासणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे किंवा आयआयएचआर बेंगलोर येथे करून अहवालाच्या निष्कर्षानुसार त्वरित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
 • इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टीटयुट, पुणे यांनी टोमॅटो पिकावरील विषाणू रोगाचे तपासणी करावी. रोगाचे तपासणी करिता लागणाऱ्या सुविधांसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व औषधी वनस्पती मंडळ अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा.
 • टोमॅटो पिकावरील विषाणूच्या नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बियाणे उत्पादक कंपन्यांनी टोमॅटो पिकाच्या समूह क्षेत्रांमध्ये ट्रायल प्लॉट घेऊन त्याचे नियंत्रणाबाबत विविध एकात्मिक नियंत्रणाबाबत कृषी विद्यापीठ व राज्य कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
 • टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विषाणूच्या नियंत्रणाबाबत जागृती निर्माण करण्याकरिता कृषी विद्यापीठ,कृषी विज्ञान केंद्र, बियाणे उत्पादक कंपन्या, कृषी विभाग व IARI यांच्या समन्वयादवारे क्षेत्रीय भेटी ,शेतकरी मेळावा, आयोजित करून सदर रोगाचे वेळीच नियंत्रण करणेबाबत नियोजन करावे.
 • टोमॅटो पिकावरील विषाणू रोगाच्या व इतर रोगाच्या नियंत्रणाबाबत विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामाचा आढावा व पुढील नियोजन करणेबाबत दर तीन महिन्यात सर्व संबंधित संस्थांची बैठक आयोजित करावी.
 • टोमॅटो पिकावरील विषाणू रोगाचे नियंत्रणकरण्याकरिता घेण्यात आलेल्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: