पावसाला सुरूवात होणार ? कधी वाढणार पावसाचा जोर ?

अमोल कुटे

पुणे : मॉन्सूनचा जोर ओसरल्याने राज्यात दोन आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. अनेक भागात तर पावसाचा थेंबही पडला नसल्याने खरीपाची पिके वाळून चालली आहेत. सध्या राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, पुढील आठवडाभरात विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात पावसाला सुरूवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि कोकणात विक्रमी पाऊस झाला होता. तर उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागात मात्र पावसाने दडी मारली होती. मराठवाडा, विदर्भातही पावसाने अपेक्षित जोर धरला नव्हता. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने पुन्हा राज्यात सर्वत्र ओढ दिली. त्यानंतर गेली दोन आठवड्यांपासून पावसात मोठा खंड पडला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात यंदा अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाअभावी राज्यातील खरीप पिके संकटात सापडली आहेत.

गेल्या आठवड्यात ६ ते ११ ऑगस्ट या कालावधीत कोकणासह राज्याच्या सर्वच भागात पावसाचे प्रमाण खुपच कमी झाले आहे. पावसात खंड पडल्याने महाराष्ट्राच्या चारही विभागात सरासरीच्या तुलनेत खुपच कमी पाऊस पडला. अनेक जिल्ह्यांमध्ये आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत १ ते ५ टक्के देखील पाऊस पडलेला नसल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (१३ ते १९ ऑगस्ट) राज्यात पावसाला सुरूवात होणार आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर कमी राहणार असल्याने सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

दुसऱ्या आठवड्यात (२० ते २६ ऑगस्ट) राज्यात सर्वदूर पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या चारही विभागामध्ये आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा पावसाने सर्वाधिक ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाच्या दडीने राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका वाढला असून, अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ३५ अंशांदरम्यान होते. पुढील आठवड्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार असून, दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या खाली येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात दोन्ही आठवड्यात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या व्हाट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *