पुणे : महाराष्ट्रात प्रामुख्याने रायगड, ठाणे,पालघर व पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी पिवळा खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. चालू वर्षी देखील खोडकिड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

या किडीच्या अळीचा प्रसार वाऱ्याबरोबर होतो, तर पंतग कमी पाऊस, जास्त सुर्यप्रकाश तसेच रात्रीची जास्त आर्द्रता असताना बाहेर पडतात. अंडयातून नुकतीच जन्माला आलेली अळी काही काळ (१ ते २ तास) पानाच्या टोकावर राहते आणि पानाचा पृष्ठभाग खरवडते. साधारणपणे १ ते २ तासाने ती आपल्या लाळेपासून एक चिकट धागा बाहेर टाकते आणि त्याला लोंबकळत राहाते. वाऱ्यामुळे अशा अळ्या सर्व शेतभर पसरतात.

तिची योग्य वाढ झाल्यावर ती खोडाकडे सरकते आणि खोडाला बारीक छिद्र पाडून आत प्रवेश करते. अळी खोडाचा गाभा पोखरुन खाते. या अळीच्या कातडीखाली असलेल्या हवेच्या पोकळीमुळे त्या पाण्यात पडल्या तरी देखील व्यवस्थित पोहू शकतात. अळी खोडात शिरली की, साधारणपणे १ आठवडयापर्यंत खोडातच राहते. एका फुटव्यात बहूतांशी एकच अळी दिसून येते. पण कधी-कधी चार अळ्या देखील आढळून येतात.

एका आठवडयानंतर अळी फुटव्याबाहेर येते आणि दुसऱ्या फुटव्यात प्रवेश करते परिणामी अनेक फुटवे मरतात. या कीडीचा प्रदुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधुंना पिवळा खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच खालील उपाय योजना करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे कराल ?

तांत्रिक पध्दतीचा अवलंब :

  • पिकाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे पाऊस सुरु होताच कोषावस्थेतून बाहेर आलेले मादी पतंग प्रकाश सापळ्यात आकर्षित करुन नष्ट करावेत.
  • किडीचे अंडीपूंज वेळोवेळी गोळा करुन नष्ट करावेत; कीडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत
  • या किडीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टर ५ फेरोमेन सापळे लावून त्या अडकलेल्या पतंगांचे निरीक्षण करावे.

जैविक नियंत्रण :

  • नैसर्गिक शत्रु उदा. बेडूक आणि चतूर अशांचे भात खाचरात संवर्धन करावे.
  • ट्रायकोग्रामा जापोनिकम या खोडकीडीच्या अंड्यावरील परोपजीवी कीटकाची १ लाख अंडी/हेक्टर या प्रमाणात २ वेळा प्रथम प्रादुर्भाव दिसून येताच व नंतर १५ दिवसांच्या अंतरात शेतात प्रसारीत करावीत.

किटकनाशकांचा वापर :

  • खोडकिडा प्रादुर्भावीत भागामध्ये पुर्नलावणीकरीता रोप उपटण्यापूवी पाच दिवस आधी कार्बोफ्युरॉन ३ जी २५ किलो प्रति हेक्टर किंवा फिप्रोनील ०.३ जी २५ किलो/हे. किंवा कारटॅप ४ जी २५ किलो/हे. किंवा फ्ल्यूबेंडामाईड २० डब्ल्यू जी १२५ ग्रॅम/हे. किंवा फिप्रोनील ०.३ जी २५ किलो/हे किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्रोल ०.४ टक्के जी आर १० किलो प्रति हेक्टर यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आलटून पालटून वापरावे.
  • कारटॅप हायड्रोक्लोराईड ७५ एस जी १० ग्रॅम किंवा फ्ल्यूबेंडामाईड ४ टक्के + बुप्रोफोजीन २० टक्के एस सी १४ मि.ली. किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्रोल १८.५ एस सी 3 मि.ली. किंवा क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २६ मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस २० ईसी २५ मि.ली किंवा कारटॅप हेड्रोक्लोराईड ५० टक्के २० ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडामाईड २० डब्लुजी २.५ ग्रॅम यापैकी कोणतेही कीटकनाशक दोन वेळा १५ दिवसाचे अंतराने १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *