पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. उद्या (ता.७) कोकणात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर मध्य प्रदेशात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, या भागात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर पासून कमी दाब क्षेत्राच्या केंद्रामधून दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तो उत्तरेकडे सरकून मंगळवारपर्यंत (ता. १०) हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याचे संकेत आहेत.

राज्यात ७ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने तापामानाचा पारा ३० ते ३२ अंशांवर गेला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. मॉन्सून सक्रीय नसल्याने राज्यात पावसाची उघडीप आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *