पुणे : दोन आठवड्यांपासून दडी मारणाऱ्या पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता.१८) राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यंदा पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचापर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यांपासून तमिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पोषक स्थितीमुळे राज्यात गुरूवारपर्यंत (ता.१९) पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

राज्यात १८ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

उद्या (ता. १८) राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज आलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील जालना, बीड, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात १८ ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

दरम्यान, मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे सर्वाधिक ३६.० अंश सेल्सिअस, अकोला येथे ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने विदर्भासह राज्याच्या विविध भागात कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मंगळवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :
वसई ४०, डहाणू, मालवण, पेण प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :
शिरूर ७०, कोपरगाव ६०, गगणबावडा, इगतपुरी, राहता, येवला प्रत्येकी ३०, कळवण, पन्हाळा, पारोळा, राधानगरी प्रत्येकी २०.

मराठवाडा :
भोकरदन ७०, औरंगाबाद, सेलू, वैजापूर प्रत्येकी २०.

विदर्भ :
भिवापूर ८०, चिमूर, घाटंजी, गोंदिया, वणी, वर्धा, झरी झामणी प्रत्येकी ४०, आमगाव, अर्जूनी मोरगाव, आर्वी, चामोर्शी, चंद्रपूर, दारव्हा, देवळी, दिग्रस, एटापल्ली, गोंड पिपरी, गोरेगाव, हिंगणघाट, करंजालाड, कुही, महागाव, परशीवणी, राजूरा, सालकेसा, सावनेर, उमरखेड, उमरेड प्रत्येकी ३०.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *