पुणे : राज्यात सुमारे दोन आठवड्यांपासून दडी मारणाऱ्या पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता.१७) कोकण, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरामध्ये ३.१ किलोमीटर ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात बुधवारपर्यंत (ता. १८) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात १७ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

उद्यापासून (ता. १७) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, विदर्भातील भंडारा, अकोला, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

राज्यात १७ ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

दरम्यान, पावसाच्या उघडिपीमुळे राज्यात उन्हाचा वाढलेला चटका चांगलाच वाढला असून, तापमानाचा पारा गेली काही दिवस सातत्याने २६ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे सर्वाधिक ३५.६ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा ३३ अंशांच्या पुढे आहे.

कोकण, मराठवाड्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :
मुंबई : सांताक्रूझ ३१.
पालघर : डहाणू ७५, पालघर ८२, तलासरी ३५, वसई ३४, विक्रमगड ३९.
रायगड : म्हसळा ५८, मुरूड ३५, रोहा ४४, सुधागड पाली ३०, तळा ४०, उरण ३५.
रत्नागिरी : दापोली ४०, लांजा ३०, मंडणगड ४१.
ठाणे : भिवंडी ३५, ठाणे ५६.

मध्य महाराष्ट्र :
सातारा : महाबळेश्वर ३४.

मराठवाडा :
बीड : माजलगाव ४५.
जालना : आंबड १२४.
लातूर : लातूर ४३, शिरूर अनंतपाळ ३०.
नांदेड : बिलोली ४६, धर्माबाद ३८.
परभणी : धालेगाव ५०, पाथरी ४२, सोनपेठ ४७.

विदर्भ :
चंद्रपूर : जेवती ३५.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *