पुणे : राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी अनुकुल हवामान होऊ लागले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १७) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत असून, १६ तारखेपासून विदर्भात पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या (ता.१३) मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकणात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

बिहार आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा दक्षिणोत्तर पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसर पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत कायम आहे. मॉन्सूनच्या आसाचे पश्चिम टोक सर्वसाधारण स्थितीत आहे. तर पूर्व टोक हिमालयाच्या पायथ्याकडे असून ते १५ ऑगस्टपर्यंत दक्षिणेकडे सरकणार आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. गुरूवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा ३३ अंशांच्या पुढे सरकला आहे.

राज्यात १३ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांपर्यंत वाढ झाली असली तरी कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. उन्हाचा चटक्याबरोबरच उकाडाही कायम आहे. उद्या (ता. १३) मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा तर, उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह, मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात १३ ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

गुरूवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २९.७ (२.४), नगर ३०.७ (२.२), जळगाव ३३.४ (३.२), कोल्हापूर २७.६ (१.५), महाबळेश्वर १९.३ (०.०), मालेगाव ३२.८ (४.१), नाशिक २८.३ (०.८), सांगली ३०.२ (२.२), सातारा २८.३ (२.१), सोलापूर ३४.६ (३.७), सांताक्रूझ ३१.८ (२.१), अलिबाग ३२.० (२.६), डहाणू ३२.७ (२.८), रत्नागिरी ३०.१ (१.७), औरंगाबाद ३१.६ (३.०), बीड ३३.७ (४.२), परभणी ३३.१ (२.८), अकोला ३४.० (३.६), अमरावती ३२.८ (३.९), बुलडाणा २९.८ (२.७), चंद्रपूर ३४.० (३.५), गोंदिया ३२.५ (१.८), नागपूर ३३.६ (३.०), वर्धा ३४.० (३.८), यवतमाळ ३१.७ (३).

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या व्हाट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *