अमोल कुटे

पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार असून, राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.  
 
जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर गेल्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बंगालचा उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र, कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा पुरक ठरल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातले.

गेल्या आठवड्यात (१५ ते २१ जुलै) दक्षिण कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडला. पूर्व विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत खुपच कमी असल्याचे दिसून आले.

१५ ते २१ जुलै या कालावधीत राज्यात पडलेला पाऊस (सौजन्य : हवामान विभाग)

उत्तर कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडलेल्या पालघर, ठाणे, नाशिक, नगर, पुणे जळगाव, धुळे जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वाधिक ओढ दिली असून, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते.

कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला. पालघर, नाशिक, नगर, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आठवड्यातील सरासरीच्या तुलनेत उणे ७४ टक्के म्हणजेच अवघा २६ टक्के, भंडारा जिल्ह्यात उणे ६२ टक्के म्हणजेच ३८ टक्के तर नागपूरमध्ये उणे ६० टक्के म्हणजे अवघा ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

२३ ते २९ जुलै या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग) (सौजन्य : हवामान विभाग)

पुढील दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात (२३ ते २९ जुलै) कोकण, विदर्भासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.

३० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज

दुसऱ्या आठवड्यातही (३० जुलै ते ७ ऑगस्ट) पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याने राज्यात सर्वदूर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावासाच्या सरी सुरूच राहणार असून, उर्वरीत राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढील दोन्ही आठवड्यातील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केलाय. यात दोन्ही आठवड्यात कमाल तापमान सरासरी ते सरासरीच्या कमी राहणार असून, पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक राहण्याचा अंदाज आहे. दोन्ही आठवड्यात किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार असून, मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *