पुणे : मॉन्सूनच्या पावसाने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर अक्षरश: धिंगाणा घातला आहे. कोल्हापूरमधील तुळशी धरण क्षेत्रात ८९५ मिलीमीटर, कोयना धरण क्षेत्रात ६१० मिलीमीटर, नवजा येथे ७४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

मॉन्सूनच्या पावसाने धरण क्षेत्रात यंदा मोठी ओढ दिली होती. त्यामुळे मागच्या आठवड्यात चिंता वाढली होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू होता. मात्र सातारा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण खुपच कमी होते. गेल्या दोन तीन दिवसांत कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. तर उत्तर पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूरमधील तुळशी धरण क्षेत्रात ८९५ मिलीमीटर, राधानगरी ५७६ मिलीमीटर, दुधगंगा ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सांगलीतील वारणावती धरण क्षेत्रात ५६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. साताऱ्यातील कोयना धरण क्षेत्रात ६१० मिलीमीटर, नवजा येथे ७४६ मिलीमीटर, महाबळेश्वर येथे ५९४ मिलीमीटर, धोम बलकवडी धरण येथे ३९९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी परिसरात ५१४ मिलीमीटर, तर मुळशी धरण क्षेत्रात ३३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू
शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धरणांतून सोडण्यात येणारे पाणी (विसर्ग – क्युसेकमध्ये) :
कोयना ९५६७, धोम ३७७१, कन्हेर ६७६८, वारणावती २४७२०, कासारी ३१६८, धोम बलकवडी ६४५८, उरमोडी ४३८३, तारळी ११३९४, खडकवासला ४२६०, वडज २११८, कळमोडी २८१९, वडीवळे ६२९४.

शुक्रवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे विभागातील धरण क्षेत्रात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : जलसंपदा विभाग)

कोयना ६१०, नवजा ७४६, वारणावती ५७४, दूधगंगा ४८०, राधानगरी ५६७, तुळशी ८९५, कासारी ३२१, पाटगांव ४३६, धोम बलकवडी ३९९, तारळी १९४, वडीवळे २१४, पवना २२७, कासारसाई २४४, मुळशी ३३२, टेमघर २७०, वरसगाव १७०, पानशेत १७०, मुळशी १७१, निरा देवधर १४२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: