अमोल कुटे

पुणे : नेर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दिल्लीसह संपुर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने मंगळवारी (ता. १३) जाहीर केले. पुरेसे अनुकूल हवामान नसल्याने वायव्य भारतात मॉन्सूनचे आगमन लांबले. यंदा सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस उशीराने मॉन्सून देशभर पोचला आहे. मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर आता चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

मॉन्सून आगमनाचा प्रवास पाहिला तर मे महिन्याच्या मध्यावर अरबी समुद्रात आलेल्या “ताऊते” चक्रीवादळामुळे विषुववृत्ताकडून येणारे प्रवाह सुरळीत झाल्याने मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले. मॉन्सून केरळात लवकर दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली. हे चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला धडकते तोच २१ जून रोजी बंगालच्या उपसागरात चाल करत मॉन्सूनने अंदमान निकोबार बेटांवर हजेरी लावली.

नकाशातील निळ्या रेषा मॉन्सूनच्या प्रगतीची वाटचाल दर्शवतात. (सौजन्य : हवामान विभाग)

दरम्यान बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळाची निर्मिती झाली. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनला काही काळ गती मिळाल्याने वाऱ्यांनी संपुर्ण अंदमान बेटांसह, दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्वीप, कोमोरीन भागात मजल मारली. त्यानंतर मात्र वाऱ्यांची दिशा आणि ढगांची निर्मिती आणि पावसाचे प्रमाण कमी असल्याने केरळमधील मॉन्सूनचे आगमन लांबले. नियमित दीर्घकालीन वेळेच्या दोन दिवस उशीराने मॉन्सून केरळमध्ये (३ जून) दाखल झाला.

केरळात दाखल होताच, मॉन्सून एक्सप्रेसचा प्रवास सुसाट गतीने सुरू झाला. अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत मॉन्सून दोनच दिवसात महाराष्ट्रात (५ जून) दाखल झाला. मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच (१० जून) संपुर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भारतात ३० जूनपर्यंत पोचणारा मॉन्सून यंदा १७ दिवस आधीच या भागात पोचला. १३ जून रोजी ईशान्य भारतासह, पश्चिम बंगाल, बिहारसह पूर्व भारत, जम्मू काश्मीरचा भाग व्यापून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भागात मॉन्सून पोचला.

वायव्य भारतात मात्र मॉन्सूनच्या वाटचालीस आडथळा निर्माण झाला. १९ जून रोजी संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व्यापून, उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग, तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने मॉन्सूनचा पुढील प्रवास थांबला.

दिर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणत: ८ जुलै रोजी देश व्यापतो. बंगालच्या उपसागरावरून येणारे वाष्पयुक्त वारे वायव्य भारतात पोचल्याने तब्बल २३ दिवसांनी मॉन्सूनने वायव्य भारतात प्रगती केली. पूर्वेकडे वाहणारे वारे, ढगांचे आच्छादन, पावसाची हजेरी यामुळे मंगळवारी (ता.१३) मॉन्सूनने संपुर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *