उद्या दिल्लीत दाखल होणार; लवकरच व्यापणार देश

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सुरळीत झाल्याने वायव्य भारतात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे. उद्या (ता.१०) राजधानी दिल्लीसह पंजाब हरियाणाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा देवभुमी केरळमध्ये उशीरा दाखल झाल्यानंतर उत्तरेकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वायव्य भारतातील वाटचाल मंदावली. मॉन्सूनने १९ जून रोजी संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व्यापून, उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग, तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली. बारमेर, भिलवाडा, अलिगड, आंबाला, अमृतसरपर्यंतच्या भागात मॉन्सूनने मजल मारली.

त्यानंतर मात्र मॉन्सूनची आणखी वाटचाल झाली नाही. दिर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणत: ८ जुलै रोजी देश व्यापतो. मात्र पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन यंदा लांबले.

बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहू लागल्याने तब्बल २० दिवसांनी मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (ता. १०) दिल्लीसह वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती होणार असून, सोमवारपर्यंत (ता.१२) मॉन्सून संपुर्ण देश व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नकाशातील निळी रेषा मॉन्सूनच्या वाटचालीची स्थिती दर्शवते. (सौजन्य : हवामान विभाग)

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा वाढणार जोर
जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय झाले आहेत. उद्या (ता.१०) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता.१०) राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, या जिल्ह्यांत सतर्कतेचा ‘ऑरेंज आलर्ट’ देण्यात आला आहे. रायगड, ठाणे, पुणे, सातारा, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरीत राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *