कोकण, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. उद्या (ता.१) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह उर्वरीत राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहार परिसरावर आहे. मध्य उत्तर प्रदेशमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाणा आणि परिसरावर असून, उद्या (ता. १) ते निवळून जाणार आहे. नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राज्यस्थानच्या गंगानगरपासून या दोन्ही कमी दाब क्षेत्रांमधून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

उत्तर भारतात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.१) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात १ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडत आहेत. शनिवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात लाखणी येथे सर्वाधिक ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली, मराठवाड्यासह उर्वरीत राज्यात पावसाची उघडीप असल्याचे चित्र होते.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

कोकण :
रायगड : पोलादपूर ३१, सुधागड पाली ५६.
रत्नागिरी : संगमेश्वर ३२.
सिंधुदुर्ग : कणकवली ३०, कुडाळ ३५.

मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : राधानगरी ३०, शाहूवाडी ५३.
पुणे : वेल्हे ३९.
सातारा : महाबळेश्वर ५९, पाटण ३२.

विदर्भ :
भंडारा : भंडारा ३१, लाखणी ८४, मोहाडी ३६, पवनी ३०, साकोली ६०.
चंद्रपूर : ब्रह्मपुरी ३३, सिंदेवाही ३२.
गडचिरोली : अरमोरी ३३, धानोरा ३०, गडचिरोली ३९, कोर्ची ३१, कुरखेडा ३१.
गोंदिया : अर्जुनी मोरगाव ३८, देवरी ४०, गोरेगाव ३७, सडकअर्जुनी ३७, तिरोडा ३१.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *