अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र ठरली पोषक

पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रीय झाला असून, पावसाने कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे सर्वाधिक ३४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यातही जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम सरी पडल्या.

अरबी समुद्रावरून वाढलेले वाऱ्यांचे प्रवाह, बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण गुजरात लगतच्या समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, तसेच या दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान कच्छ, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड, आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) पावसासाठी पोषक ठरला आहे.

दक्षिण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे २४ तासांतील सर्वाधिक ३४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर म्हसळा येथे २१०, श्रीवर्धन येथे २१४ मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरीतील दापोली येथे २३०, सिंधुदुर्गमधील वैभववाडी येथे २०३, तर कोल्हापूरातील गगणबावडा येथे २०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजापुर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडला. नांदेड येथे १४४ मिलीमीटर, अर्धापूर १२२ मिलीमीटर, परभणीत १६१ मिलीमीटर तर पाथरी येथे १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस (स्त्रोत : हवामान विभाग)
कोकण :
रायगड : अलिबाग ९४, म्हसळा २१०, मुरूड ३४८, पोलादपूर ९२, श्रीवर्धन २१४, तळा १३१.
रत्नागिरी : चिपळूण १७७, दापोली २३०, गुहागर १०६, हर्णे १६४, खेड ११२, लांजा १३५, मंडणगड १४०, राजापूर १४२, संगमेश्वर १४०.
सिंधुदुर्ग : देवगड १४०, दोडामार्ग १३८, कणकवली २१०, कुडाळ १३५, मालवण १५२, मुलदे (कृषी) ४९, रामेश्वर ११७, सावंतवाडी १०५, वैभववाडी २०३.

मध्य महाराष्ट्र :
नगर : नेवासा ५६, पारनेर ४१, श्रीरामपूर ४९.
कोल्हापूर : गगणबावडा २०५, पन्हाळा ५०, राधानगरी ७६. नाशिक : येवला ४५.
सातारा : महाबळेश्वर ६८.

मराठवाडा :
बीड : अंबाजोगाई ४३.
हिंगोली : औंढा नागनाथ ८२, हिंगोली ४२, वसमत ६२.
जालना : घनसांगवी ५४, मंथा ४५.
लातूर : चाकूर ४८, जळकोट ७५, शिरूर अनंतपाळ ५०.
नांदेड : अर्धापूर १२२, बिलोली ४२, धर्माबाद ८५, कंधार ६३, मुदखेड ८१, मुखेड ४१, नांदेड १४४, उमरी ७४.
परभणी : गंगाखेड ४३, जिंतूर ३८, मानवत ५४, परभणी १६१, पाथरी १०५, पुर्णा ८५, सोनपेठ ४५.

विदर्भ :
अकोला : तेल्हारा ५३.
अमरावती : धारणी ५४.
बुलडाणा : मेहकर ४०.

वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती
तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरावरून येत असलेले वाष्पयुक्त वारे, ढगांचे वाढलेले आच्छादन, पावसाला सुरूवात झाल्याने राजस्थान आणि पंजाबचा बहुतांशी भाग, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. वायव्य भारतात १९ जूननंतर थांबलेला मॉन्सूनचा प्रवास सुरू झाला असून, लवकरच मॉन्सून देश व्यापणार आहे.

मंगळवारी (ता. १३) राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भातही सर्वदूर पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उद्या (ता. १३) रायगड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अतिदक्षतेचा (रेड आलर्ट) तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात सतर्कतेचा (ऑरेंज आलर्ट) इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *