बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र देणार चालना
पुणे : महाराष्ट्रात दाखल होताच सुसाट धावणाऱ्या मॉन्सून एक्सप्रेसचा वेग काहीसा मंदावला. पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वेळेआधीच दाखल होणाऱ्या मॉन्सूनने गेले दोन दिवस कोणतीही वाटचाल केलेली नाही. बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता.११) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रामुळे वाऱ्यांना पुन्हा चालना मिळणार असून, दोन ते तीन दिवसात मॉन्सून मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात प्रगती करण्याची शक्यता आहे.
अंदमान बेटांसह केरळातील आगमन लांबल्याने मॉन्सून यंदा ३ जून रोजी दक्षिण केरळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्ररावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. रविवारी (ता.६) तब्बल चार दिवस आधीच पुण्यात हजेरी लावली. मुंबईत पावसाने हजेरी लावली असली तरी, अद्यापही मॉन्सून दाखल झालेला नाही.
रविवारी (ता. ८) अलिबाग, पुण्यासह मराठवाड्याच्या काही भागात प्रगती करणाऱ्या मॉन्सूनने पश्चिम बंगालसह, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये हजेरी लावली. संपुर्ण कर्नाटक, तामिळनाडूसह, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेशचा काही भाग, संपुर्ण ईशान्य भारत, पश्चिम बंगाल हिमालयाकडील भाग आणि सक्कीम राज्यात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर दोन दिवसांत मॉन्सूनने पुढे वाटचाल केलेली नाही. दोन ते तीन दिवसांत मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
