पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्यात दाखल झाल्यानंतर कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला. मात्र, राज्याच्या विविध भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. येत्या आठवडाभरात राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होणार असून, उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरीत महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कोकण आणि राज्याच्या उत्तर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या आठवड्यात (१७ ते २३ जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या घाटमाथ्यावर पावसाने हजरी लावली. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत पावसाची दडी असल्याचे चित्र होते. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली, विदर्भातील भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर धुळे, अकोला, वाशीम, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये खुपच कमी पाऊस पडला.

पुढील दोन आठवड्यांचा पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात पहिल्या आठवड्यात (२५ जून ते १ जुलै) कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर नगर, पुणे, सातारा, सांगलीसह, मराठवाडा, विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची अंदाज आहे. दुसऱ्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) विदर्भासह मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक उर्वरीत महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ( नकाशे पहा)

नकाशा : पुढील दोन आठवड्याचा पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग )

पुढील दोन्ही आठवड्यातील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यात आठवडाभर कोकणाच्या काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक, मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. (नकाशे पहा)

नकाशा : पुढील दोन आठवड्यातील कमाल व किमान तापमानाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग )

मॉन्सूनची प्रगती नाही
देवभूमी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांत देशाच्या बहुतांशी भागात मॉन्सून पोचला. पुरेशा अनुकुल वातावरणीय स्थितीआभावी राजधानी दिल्लीसह वायव्य भारतात मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. या भागात मॉन्सून दाखल होण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *