पुणे : देवभूमी केरळमध्ये उशीराने दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुढील प्रवासात वेगाने वाटचाल केली. मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच संपुर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. संपुर्ण राज्यात मोसमी वारे पोचले असले तरी, शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

यंदा अंदमान बेटांवर एक दिवस तर, देवभूमी केरळ दोन दिवस उशीराने (३ जून) मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्ररावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. ६ जून रोजी तब्बल चार दिवस आधीच मॉन्सून पुण्यात दाखल झाला. त्यानंतर दोन दिवस कोणतीही वाटचाल केली नव्हती. वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सक्रीय झाल्याने काल (ता.९) मॉन्सूनने मुंबईसह बहुतांशी महाराष्ट्र व्यापला.

आज (ता. १०) मॉन्सूनने विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत भागासह संपुर्ण राज्य व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. आज मॉन्सूनने गुजरातच्या सुरतसह, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भागात प्रगती केली आहे. येत्या दोन दिवसात संपुर्ण पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगडसह, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागरात उद्या (ता.११) सकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची क्षेत्रे पावसासाठी पोषक ठरतात. वायव्येकडे सरकून जमीनीवर येणाऱ्या या प्रणालीमुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.

शनिवारी (ता. १२) पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

कोकण, घाटमाथा, विदर्भात वाढणार जोर
मॉन्सूनने राज्य व्यापले असून, मुंबईसह कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. उद्यापासून कोकण, घाटमाथा, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, विदर्भात अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *