मॉन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

पुणे : मॉन्सून एक्सप्रेस सुसाट वेगाने धावू लागली आहे. आज (ता.५) मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील हर्णे, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर, आणि मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशीराने दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या “यास” चक्रीवादळाने मॉन्सूनचा वेग काही काळ वाढविला. मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असतानाच, मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले.

जवळपास आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले. नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशीराने मॉन्सून गुरूवारी (ता. ३) दक्षिण केरळात डेरे दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत संपुर्ण केरळसह, कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, कर्नाटकचा दक्षिण अंतर्गत भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, तसेच बंगालच्या उपसागसाच्या काही भागात प्रगती केली आहे.

वाटचालीस पोषक हवामान असल्याने आज (ता.५) दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून साधारणतः ७ जूनच्या आसपास दाखल होतो. आज संपुर्ण कर्नाटक, गोव्यासह, महाराष्ट्राच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेसह सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासह कर्नाटकातील कर्नूल, तिरूपती, कुड्डालोरपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागासह, ईशान्य भारतात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या सुधारीत अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *